Tuesday, June 9, 2015

जांभूळ : नवीन आवृत्ती



१९८१मध्ये पहिली आवृत्ती आलेल्या 'जांभूळ' या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती मौज प्रकाशनानंच काढलेय, मार्च २०१४मध्ये. मुखपृष्ठ- वसंत सरवटे. किंमत- दोनशे रुपये.

या कथासंग्रहात 'जांभूळ', 'कमाई', 'कैवल्य', 'अग्निसर्प' व 'हुंकार' अशा पाच कथा आहे. पहिली साधारण सत्तर पानांची कथा आहे, एखादी सोडता बाकीच्याही मोठ्या आहेत, २१० पानांचं पुस्तक आहे.

Tuesday, September 11, 2012

एका नृत्याचा जन्म : नवीन आवृत्ती


श्री. दा. पानवलकरांच्या 'एका नृत्याचा जन्म' ह्या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती जानेवारी २०१२मध्ये आलेय. मौज प्रकाशनच. पहिली आवृत्ती जून १९७५ मध्ये आलेली.
अपील -- सावली -- अजन्मा -- टक्कर -- गारठा -- बक अप रावण! -- ओलीस -- अनाहत -- भूमी -- फोमण्या येत आहे! -- चांदणं -- प्रवासी -- सहदेवा, अग्नी आण! -- एका नृत्याचा जन्म - या चौदा कथा आहेत ह्या संग्रहात.
मुखपृष्ठ आहे वसंत सरवट्यांचं आणि किंमत आहे एकशेपन्नास रुपये.

Saturday, July 23, 2011

शूटिंग

पानवलकरांच्या 'शूटिंग' या पुस्तकावरील 'ब्लर्ब', (सुरुवातीला काही संदर्भ स्पष्ट होण्यासाठी)-


अर्धसत्य या गाजलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची ही दैनंदिनी आहे. या चित्रपटाची सूर्य ही मूळ कथा लिहिणारे श्री. दा. पानवलकर यांनीच या सर्व चित्रीकरणाला चिकाटीने उपस्थित राहून ही दैनंदिनी लिहिली असल्यामुळे तिच्यात आत्मीयता आली आहेच, पण पानवलकरांच्या चित्रदर्शी लेखणीची धार आणि तळपही या पुस्तकाला लाभली आहे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरणी अथपासून इतीपर्यंत तपशीलवार नोंदणारे असे पुस्तक मराठीत तर नाहीच, पण इतर अनेक भारतीय भाषांमध्येही प्रकाशित झालेले नसेल. चित्रपटकलेशी संबंधित असणारे कलावंत व तंत्रज्ञ यांच्यापासून तो चित्रपट व साहित्य या दोहोंच्या रसिकांपर्यंत सगळ्यांनाच हे पुस्तक वेधक वाटेल. (भरपूर छायाचित्रांमुळे या दृश्यप्रधान चित्रपट-माध्यमावरील पुस्तकाची प्रत्ययकारिता वाढली आहे.)


श्रीकृष्ण दामोदर पानवलकरांनी कधीकाळी एकांकिका, नाटक, ललित लेखही लिहिले असले तरी मराठी रसिक त्यांना ओळखतात ते कथालेखक म्हणून. १३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे जन्मलेल्या पानवलकरांनी जन्मगावीच माध्यमिक शिक्षण पुरे करून मुंबईत तीस वर्षे कस्टम्स खात्यात अधिकारी म्हणून नोकरी बजावली. या काळात गजगा (१९६३), औदुंबर (१९६३), सूर्य (१९६८), एका नृत्याचा जन्म (१९७५), चिनाब (१९७८) हे कथासंग्रह आणि जांभूळ (१९८१) हा दीर्घकथासंग्रह अशी त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यांपैकी औदुंबर, सूर्यचिनाब यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, सूर्य या कथेला अभिरुची कथास्पर्धेत पारितोषिक मिळाले, आणि अर्धसत्यच्या मूळ कथेचे लेखक म्हणून त्यांना १९८४चे फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी, दि. १९ ऑगस्ट १९८५ रोजी सांगली या आपल्या जन्मगावीच श्री. दा. पानवलकर दिवंगत झाले. 

Saturday, July 9, 2011

हस्ताक्षर

ज्या पुस्तकाचे आभार मानून हा ब्लॉग तयार केलाय, त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला पानवलकरांच्या हस्ताक्षरातला एक परिच्छेद दिला आहे-

***
त्याचे हे काही विसंगत फोटो-
 



















***
हा मूळ मजकूर-

‘‘राघव, भद्र, अभ्रद असं काही या उभ्या जन्मात नसते. कापुरात आग लागली म्हणजे कापूर जळून जातो. आग उरत नाही. काजळ म्हणशील तर तेही दिसत नाही. उभयातीत उरतं फक्त आकाशसदृश अणूपरमाणूंचं घनदाट अस्तित्व. सगळी सृष्टी त्याच्याशी संवाद करते. सुखदुःखाचा निरास तिथे होतो. साऱ्या वस्तूमात्राची झेप तिकडं. विश्वाचं प्रतिबिंब तिथं उतरतं. जे घडतं ते अभद्र नसतं. सतत घडत रहाणं ही स्थितीगती. ती भद्रच असते असं नाही. काही न उरणं व सतत घडत रहाणं हा सृष्टीचा अनंत नियम . . . .’’
 ***

आणि हे पानवलकर-

Thursday, July 7, 2011

पानवलकरकाका

- प्रिया तेंडुलकर

माझ्या आसपासच्या जगाची जाणीव मला व्हायच्या आधीपासून पानवलकरकाका माझ्या जगात होते. एक महत्त्वाची जागा व्यापून होते. माझ्या बाबांचे ते सगळ्यात जवळचे सख्खे मोठे मित्र होते. माझ्या बाबांना तसे मित्र कमीच; आणि त्यातून माझे काका असलेले मित्र तर फारच कमी. आणि असं असूनसुद्धा आम्ही मुलं त्यांना पानवलकरकाका इतक्या लांबलचक नावानं का हाक मारत होतो, किंवा नुसतंच काका का म्हणत नव्हतो, हे मला माहीत नाही. त्यांना या पल्लेदार नावानं हाक मारायची आम्हाला इतकी सवय झाली होती, की आमची आजी एकदा त्यांना चुकून पानकाका म्हणाली होती, तर पानवलकरकाकांसकट आम्ही सगळ्यांनी तिची भरपूर टिंगल केली होती.
माझ्या लहानपणीचे पानवलकरकाका उंच, आडदांड, देखणे होते. कस्टमच्या त्यांच्या नोकरीत रात्रपाळ्या करून त्यांचे डोळे कायम लाल झालेले असत. इतिहासाच्या पुस्तकातल्या औरंगजेबासारखे ते मला भासत. बाबांना मी कधी हे म्हटल्याचं आठवत नाही. पण त्यांनी एकदा पानवलकरकाकांचे हुबेहुब इतिहासाच्या पुस्तकातल्या औरंगजेबासारखे गोटाटोपी घालून, हातात गुलाबाचं फूल घेऊन फोटो काढले होते. त्यावरून त्यांनाही पानवलकरकाकांच्या चेहेऱ्यात औरंगजेब दिसत असावा. माझ्या छोट्या सहा महिन्यांच्या भावाची जरीची गोटाटोपी घातलेले, हातातलं फूल नाकाजवळ धरून, शराबी डोळ्यांनी मोठ्या ऐटीत लोडाला टेकून बसलेल्या पानवलकरकाकांचे ते फोटो अजूनही आमच्याकडे आहेत. त्या दिवसांत ते केव्हाही आमच्या डोबिंवलीच्या घरी येत. अगदी अपरात्रीसुद्धा. अनेकदा त्यांच्या कस्टम्सचा गणवेष घालून येत. त्यात तर ते एखाद्या सिनेमा-नटासारखे दिसत. पानवलकरकाका आले असं ऐकताच आम्ही मुलं झोपेतूनही तडातड उठून बसत असू. त्याला मुख्य कारण म्हणजे पानवलकरकाका कधीच रिकाम्या हातानं येत नसत. उंची विलायती चॉकलेट्स, केक्स, बिस्किट्स असा काहीतरी, आम्हाला एरवी कधीही खायला न मिळणारा मेवा ते प्रत्येक वेळी आमच्यासाठी घेऊन येत नि पुढचे चारपाच दिवस आमची अगदी चंगळ उडवून देत. प्रत्येक वेळी त्यांनी आमच्यासाठी असा खाऊ आणला की ते आम्हाला हलक्या दबलेल्या आवाजात सांगत, ‘‘याचे कागद बाहेर कुठे असेतसे फेकू नका हां!’’ ते असं का सांगत हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. पण त्यांचं ते आडदांड व्यक्तिमत्त्व, रात्री-अपरात्री येऊन थडकणं, कधीही न मिळणारा उंची खाऊ आणणं, यामुळं ते मला एखाद्या रहस्यकथेतल्या हीरोसारखे वाटत. त्यांनी आणलेल्या खाऊच्या मागे काहीतरी गूढ आहे असं वाटत राही; आणि तो खाण्यात एख वेगळीच मजा येई. कागद बाहेर फेकाचे नाहीत ही त्यांची हलक्या आवाजातली आज्ञा मी इतकी काटेकोरपणे पाळत असे, की परवापरवापर्यंत त्यांनी आणलेल्या खाऊच्या चांद्या आणि कागद माझ्याकडे पुस्तकात दाबून दडवून ठेवलेले होते.
माझ्या आईचं सुंगधाचं वेड तर त्यांनी खूपच जोपासलं होतं. आठवणीनं ते तिच्यासाठी तिच्या आवडीची उंची पर्फ्यूम्स आणि अत्तरं घेऊन येत. त्यांची आवड उत्तम दर्जाची होती. त्यांनी तिच्यासाठी आणलेल्या साड्या पार फाटून जाईपर्यंत नेसून झाल्यावर ती तसलेच रंग शोधत दुकानादुकानातून फिरली. पण तिला कधीही यश आलं नाही. बाबांचे जसे फारच कमी मित्र आमचे काका होते, तसेच त्यांचे फारच कमी मित्र आईचेही मित्र होते. पानवलकरकाका हे त्यांतले एक. ते घरी आले आणि बाबा घरी नसले तर ते इतरांसारखे आल्या पावली परत फिरत नसत. उलट आईनं त्यांना ‘‘अहो पण तेंडुलकर नाहीत’’ असं म्हटलं तर ते म्हणत, ‘‘मग काय झालं? तुम्ही आहात, पोरं आहेत.’’ त्या वयात बाबांच्या मित्रानं आमच्याशी तासन्-तास बसून बोलणं, खेळणं याचा केवढा आनंद होत असे. हा आनंद पानवलकरकाकांनी आम्हाला भरपूर दिला.  आम्हा मुलींचे नाच पहाणं, राजाशी गोट्या खेळणं, आईशी वाढत्या महागाईवर गप्पा करणं, आजीशी गुरगुट्या भात कसा करतात यावर चर्चा करणं, हे ते फारच मनापासून करीत. मी मोठी झाल्यावर असंच त्यांच्याशी बोलताना त्यांना एकदा म्हटलं की, ‘‘तुम्ही आमचे नाचबीच काय कौतुकानं पहायचात. मला तर अगदी सितारादेवी असल्यासारखं वाटायचं.’’ तर ते म्हणाले, ‘‘छ्या छ्या! कौतुकबिउतुक काही नाही. तुम्ही नाचायचातच चांगल्या. तू खरंच सितारादेवी व्हायचीस. पण मधेच दुसरी नस्ती खुळं शिरली तुझ्या डोक्यात. ’’ आता एखाद्या सिनेमामध्ये जेव्हा मला नाच करावा लागतो, तेव्हा डोकं धरून बसलेला डान्समास्तर, तुझ्यात चुकीच्या ठेक्यात नाचायचा इतका कॉन्फिडन्स आला कुठून असं विचारतो, तेव्हा मला पानवरकरकाकांचे आभार मानावेसं वाटतं.
पण पानवलकरकाकांचे आभार मला अनेक कारणांसाठी मानावेसे वाटतात. मला आठवतं, मी कॉलेज अर्ध्यावर सोडून खऱ्या अर्थानं ज्याला उनाडक्या म्हणतात त्या करत मजेत जगत होते. त्या काळात बाबांना हाय ब्लडप्रेशरचा अटॅक आला. बराच काळ ते ह्या आजारानं बिछान्यावर पडून होते. पानवलकरकाकांना कळलं तेव्हा ते भल्या सकाळीच आले. बाबांजवळ बसले, आईशी बोलले आणि मग बाहेरच्या खोलीत मी भेटायला आलेल्यांशी बोलत बसले होते, तिथं येऊन बसले. ‘‘बरं, तुझं काय चाललंय?’’त्यांनी मला विचारलं.
मी नेहेमीसारखी नुसतीच हसले.
‘‘काय चाललंय?’’ त्यांनी परत विचारलं.
‘‘काही नाही.’’ मी म्हणाले.
‘‘काही नाही? अग तुझ्या बापाला एवढ्या आजारपणातसुद्धा त्याच्या कामाची चिंता लागलीय; आणि या कामं करायच्या वयात तू काहीही करीत नाहीस? किती वर्षं त्यांनी पैशाची चिंता करायची? तू आता मोठी झालीस. तुझ्यासाठी त्यांनी किती कष्ट केले! तुझ्या आजारपणात हॉस्पिटलात रात्री तुझ्या उशाशी बसून तो माणूस लिहीत असे. – तुझ्या हॉस्पिटलचा खर्च करण्यासाठी पैसे हवेत म्हणून. आणि तू शिक्षण सोडून उनाडक्या करतेस?’’
बैठकीच्या खोलीत अनेक मान्यवर मंडळी बसली होती. माझी कानशिलं तापल्याचं मला अजून आठवतंय. तिथून ताडकन उठून मी आतल्या खोलीत जाऊन भरपूर रडले. पानवलकरकाकांचा मला राग-राग आला. पण दुसऱ्या दिवशी तशीच ताडकन उठून जाहिरातींच्या कचेऱ्यांतून धाकट्या बहिणीला आधारासाठी घेऊन वणवण भटकले. इतके दिवस ऐषआरामात जगलेल्या मला कामं मागत फिरणं विलक्षण त्रासदायक होत होतं. वर्तमानपत्रांतल्या जाहिराती बघण्याचा छंदच मला लागला. दिसली आपल्यायोग्य जाहिरात, की घे सर्टिफिकेट्स आणि जा तिकडे, असा सपाटाच मी लावला. तिथून पुढं मी जो मॉडेलिंग करायचा, नोकऱ्या धरायचा आणि सोडायचा सपाटा लावला, तो आजपर्यंत कायम आहे. अजूनही रोज सकाळी मी ताडकनच उठते. आज कुठं कामाला जायचंय ते आठवत बसते. त्या दिवशी जर पानवलकरकाकांनी मला चारचौघांत ती शाब्दिक चपराक दिली नसती तर आज मी आहे तशी नसते. हे नंतर कळलं. पण त्या दिवसानंतर बरेच दिवस मी त्यांच्याशी अबोला धरला होता. त्यांना ते कळलं की नाही, कुणास ठाऊक. कारण त्यांच्या मनाचा थांगपत्ता त्यांनी मला कधीच लागू दिला नाही. पण आलीकडे ते माझं कन्यादान नाटक पाहून झाल्यावर मला म्हणाले, ‘‘व्वा! मला तुझा अभिमान वाटला.’’ तेव्हा मला फारच अवघडल्यासारखं झालं. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही माझी कानउघडणी केली नसतीत तर यातलं काहीच शक्य नव्हतं. हे सगळं तुमच्यामुळं...’’ तर त्यांनी मला पुरतं बोलूही दिलं नाही. नाटकामुळं त्यांची मनःस्थिती फारच अस्वस्थ झाली होती. ते माझे हात पकडून मला म्हणाले, ‘‘छे छे! तसलं काही नाही. मी कोण ग? तू काही उनाड मुलगी नव्हतीस. तुझ्या बापाची लेक आहेस तू त्यांच्यामुळं.’’ आणि एकदम हात सोडून ते निघून गेले. मी मागं वळून पाहिलं, तर रवीन्द्रनाथ टागोरांच्या पुतळ्याजवळ पाठमोरे उभे राहून ते डोळे पुसत होते. एकदा वाटलं, त्यांच्याजवळ जावं. पण मग मनात आलं : त्यांना आवडेल का? नाटक बघून ते इतके अस्वस्थ झाले होते, की कदाचित त्यांना एकटं रहायला हवं असावं. मी काही वेळ तिथंच थांबले. तर कुणीतरी नाटकातल्याच व्यक्तीनं त्यांना पाहिलं आणि अहो पानवलकर म्हणत ती व्यक्ती त्यांच्याकडे गेली. पानवलकरकाकांना पुन्हा नॉर्मल होऊन त्यांच्याशी बोलताना पाहिलं, आणि मी तिथून निघाले. रवीन्द्रनाथांच्या पुतळ्याजवळ पाठमोरे उभे राहून हातरुमालानं डोळे पुसणारे पानवलकरकाका हे मला विसरता न येणारं चित्र आहे. त्या दिवशी त्या प्रसंगी ते जसे होते तसे त्याआधी किंवा त्यानंतर कधी मला दिसले नाहीत. आपल्या भावना आपल्या आत कुठंतरी कुलुपात ठेवून किल्ली हरवल्यासारखे ते असत. निदान माझ्याबरोबर तरी. आम्ही बरोबर असलो, फोनवरून बोलत असलो तर त्यांचं बोलणंवागणं मला मनापासून असल्यासारखं वाटे; आणि तरीही ते आत खूप साठवून आहेत बरंच काही सांगू इच्छित नाहीत, असंही वाटे. काका-पुतणीचं आमचं नातं ओलांडून आमची अधिक मैत्री होऊ शकेल असंही मला अनेकदा वाटे. पण ते जमलंच नाही. माझा काका होऊन रहाणंच त्यांना जास्त पसंत होतं, की मला त्यांची पुतणी असण्यापलीकडे जाऊन त्यांच्याशी दोस्ती करणं जमलं नाही, कुणास ठाऊक! पण त्यांचा एक वचक होता, धाक होता. त्यांच्या खाजगी विश्वाभोवती त्यांनी बांधलेला तट मला कधीही मोडता आला नाही. तसं व्हावं असं मला फार वाटे. विशेषत: त्यांच्यातल्या लेखकाचं थोरपण मला जितकं अधिकाधिक उमजू लागलं, तेव्हापासून. हा माझा काका इतका साधा रहातो. वरवरून तरी चारचौघांसारखंच जीवन जगतो. बरं, तसं दाखवतो म्हणावं तर त्यांच्या सगळ्याच जगण्यामध्ये इतका सरळ स्वाभाविकपणा आहे, की आतबाहेरपणा त्याला जमणारा नाही, असा विश्वासही वाटतो. मग त्यांच्या लेखनात इतका वेगळेपणा, इतकी उंची, इतकी खोली येते कुठून? की त्यांचं हे असं असणंच त्याला लेखक म्हणून इतकं मोठं करतं? त्यांच्यातला लेखक कसा घडतो हे कळण्यासाठी माणूस म्हणून त्यांना उलगडून पहावं असा मोह अनेकदा होई. या माझ्या इच्छेची थोड्याफार प्रमाणात पूर्तीही त्यांनी एकदा केली होती. थोडीफार काय, मला त्या वेळी झालेला आनंद मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
झालं काय, तर एकदा त्यांच्या रहात्या घराची किल्ली त्यांच्याकडून हरवली, आणि दुसरी किल्ली ज्यांच्यापाशी होती ते त्यांचे शेजारी श्री. धामणस्करही काही कारणामुळं घरात नव्हते. कुणाला कधीही आपल्यामुळं त्रास होऊ नये याची विलक्षण काळजी घेणारे पानवलकरकाका रात्रभर एकटे मुंबईत भटकले. काही दिवसांनी आमच्या घरी येऊन त्यांनी तो सगळा अनुभव त्यांच्या त्या चवदार शैलीत मला मनातल्या सगळ्या भावनांसह सांगितला. ऐकताना मला जो आनंद होत होता, तो शब्दांत सांगता येणार नाही. माझा आवडता लेखक त्याच्या आयुष्यातला एक खाजगी प्रसंग मला इत्यंभूत सांगत होता. त्याच्या आयुष्यातला एक कप्पा फक्त माझ्यासाठी उघडत होता. तो सगळा अनुभव ऐकल्यावर मी उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘पानवलकरकाका, तुम्ही यावर गोष्ट लिहिणार!’’ त्यावर ते पुन्हा एकदा काका झाले आणि म्हणाले, ‘‘ह्यॅ: असं काय लिहायचं म्हणून लिहिता येत नाही. ते घडावं लागतं. गोष्ट घडावी लागते.’’
‘‘मग ही घडलेली गोष्ट नाही का?’’ मी विचारलं. तर ते म्हणाले, ‘‘तशा काय रोज गोष्टी घडतात ग! पण त्या सगळ्याच लिहून होत नाहीत. घडलेली गोष्ट कागदावर उतरवून होणं हेही घडावं लागतं. अनेकदा ते अशक्यच होतं. हे असले बारकेसारके अनुभव लिहून काढावेसे वाटेपर्यंत बिनमहत्त्वाचे वाटतात. काही घडणं, लिहावंसं वाटणं आणि लिहून होणं या तीन गोष्टींत फार मोठं अंतर आहे. ’’
मी गप्पच राहिले. ते जे बोलले त्याचा अर्थ लावत राहिले. आणि एक दिवस त्यांनी फोन केला.
‘‘तुझं म्हणणं खरं झालं. मी त्या अनुभवावर गोष्ट लिहिली. त्याची पहिली वाचक तू’’ ते म्हणाले.
मी म्हणाले, ‘‘श्री. दा. पानवलकर या मराठीतल्या सर्वोत्तम कथालेखकानं एक गोष्ट मी त्यांनी लिहिण्याआधी ऐकली, आणि तिची पहिली वाचक व्हायचा मान मला मिळाला होता असं मी माझ्या नातवंडांना सांगणार!’’
तर ते म्हणाले, ‘‘बरोबर बोललीस! हा वेडा कोण होता हे त्यांना कळणारही नाही, म्हणून आधी माझी ओळख करून द्यायचं ठरवलंस ते बरं केलंस. पण त्यानंतरही तुझ्या नातवंडांनी तुला वेड्यात काढलं तर मी अगोदर बजावलं नव्हतं असं म्हणू नकोस.’’
स्वतःबद्दल त्यांची मतं नेहेमी ही अशीच असायची. चार शब्द खरडून ते छापून आल्याआल्या स्वतःला शेक्सपीअरचा बाप समजणाऱ्या लेखकांच्या गर्दीत हा माणूस आयुष्यभर असा कसा राहिला, याचं मला एके काळी फार आश्चर्य वाटे. नंतरनंतर खात्री वाटू लागली, की पानवलकरकाका असेच आहेत. गर्व, प्रौढी वगैरे शब्दप्रयोग तर त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर आहेत. स्वतःबद्दल बोलणं तर सोडाच, पण इतरांनी केलेला त्यांचा गौरवही त्यांना कधी फारसा आवडला नाही. हे सगळं म्हणजेच पानवलकरकाका आहेत. ‘‘त्या माणसाची मला फार भीती वाटते ग.’’ ते मला एकदा कुणाबद्दल तरी म्हणाले. मी विचारलं, ‘‘का?’’ तर म्हणाले, ‘‘तो फारच स्तुती करतो माझी.’’ त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं, तर मी त्यांचं फोनवरून अभिनंदन केलं. फोनही त्यांनीच केला होता. मी म्हणाले, ‘‘अभिनंदन, पानवलकरकाका.’’ तर म्हणाले, ‘‘हो. तेवढ्याचसाठी फोन केला होता. फिल्मफेअरचा दर्जा घसरला. एके काळी काय शान होती. थोरामोठ्यांना मिळायची बक्षिसं.’’ मी त्यांन दटावून म्हटलं, ‘‘माझ्या बाबांना पण मिळालंय बक्षिस.’’ तर म्हणतात कसे, ‘‘अरे! मी विसरलोच! मी तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीशी बोलतोय!’’

बाबांचं आणि त्यांचं नातं विलक्षणच होतं. बरेच दिवस पानवलकरकाकांची खुशाली कळली नाही, तर बाबा अतिशय अस्वस्थ व्हायचे. कॅडल रोडवरून येताजाता गाडीतून डोकावून त्यांच्या इमारतीतल्या खिडकीकडे न चुकता पहाणं हे तर त्यांच्या अंगवळणी पडलं होतं. आहे इतकं.... खिडकी उघडीच आहे.... शिरावं का?’, नाही वाटतं. कुठं गेला?’—असे अंदाज ते बांधत रहात. खिडकी उघडीच आहे म्हणून चार जिने चढून अनेकदा बाबा त्यांच्या खोलीपर्यंत जात; तर दाराला कुलूप असे. आणि खिडकी बंद आहे म्हणून न जायचं ठरवीत; तर त्या दिवशी ते नेमके घरात असत. ‘‘दोघे घरात नसताना खिडकी बंद करत जा पाहू. ’’ बाबा म्हणत.
‘‘अहो काय आहे तेंडुलकर, खिडकीचे प्रॉब्लेम्सच होतात. घरात असताना खिडकी उघडी ठेवली तर कधीकधी फार कावळे येतात हो! आणि अनेकदा बाहेर जाताना उघडी ठेवतो; कारण बंद करायचाच विसरतो!’’
मग बाबांनी असं ठरवलं की ते घरात असले तर त्यांनी खिडकीत रुमाल बांधून ठेवायचा! ‘‘च्यायला! तो बांधलेला रुमाल सोडायचं लक्षात रहायला हवं हो! पण काहीतरी करायला हवं.’’
अशी त्या खिडकीवर अनेकदा चर्चा होई. शेवटपर्यंत दोघांनाही काही तोडगा काढता आलाच नाही.
पानवलकरकाकांच्या घरी येण्याचंही असंच असे. एकदा बाबांना खूप काम असल्यामुळं त्यांनी आम्हाला बजावून ठेवलं की, ‘‘कुणी आलं तर मी घरात नाही असं सांगा. मला लिहायचंय.’’ रविवारचा दिवस होता. माणसांची रीघच लागली. आई आपली सगळ्यांना सरळ चेहेऱ्यानं बाबा नसल्याचं सांगत होती. माणसं तरीही उठेनात. चहा-पाणी झालं तरीही आपापसात बोलत सगळी बसलेलीच. आम्ही मुली बाबांना आत जाऊन, बाबा, हे आलेत, ते आलेत असे रिपोर्ट्स देत होतो. बाबा शांत चेहेऱ्यानं लिहीतच राहिले. आणि मग पानवलकरकाका आले. मी आत जाऊन बाबांना ते आल्याचं सांगितलं. ‘‘हा कुठून आला आज?’’ बाबा म्हणाले आणि अस्वस्थ झाले. पेन बंद करून खोलीत येरझारा घालू लागले. मला म्हणाले, ‘‘हळूच कुणाला दिसू न देता माझ्या चपला आत आण.’’ मी चपला आणून दिल्यावर ते आईला म्हणाले, ‘‘पानवलकर आलाय. मी गॅलरीतून खाली उतरतो.’’ आणि कपडे बदलून गॅलरीतून ते बाहेरून आल्यासारखे बेल वाजवून घरात शिरले.
त्या वेळी आमचं घर तळमजल्यावर होतं म्हणून हे शक्य झालं. पण आम्ही नंतर दुसऱ्या मजल्यावर रहायला आलो, आणि पुन्हा एका रविवारी असंच झालं. पानवलकरकाका जेवायला येणार होते, आणि नेमकी त्याच दिवशी बरीच माणसं येऊ लागली. बाबा म्हणाले, ‘‘मी आता लिहीत बसतो. तुम्ही यांना मी नाही म्हणून सांगून परतवा- पानवलकर यायच्या आत.’’
बोलणं सोपं होतं. पण माणसं हलेनात. आणि अखेर पानवलकरकाका आले. ‘‘अरे, नाहीत? मला तर जेवायला या म्हणाले.’’ झालं! माणसांना वाटलं, म्हणजे येतीलच इतक्यात. बरं, एरवी पार स्वयंपाकघरापर्यंत येणारे पानवलकरकाका त्या दिवशी पाहुण्यासारखे बाहेरच बसून राहिले! सगळ्यांसमोर त्यांना आत या म्हणायची पंचाईत! वरून त्यांनी लकडा लावलाः ‘‘मी जातो. तेंडुलकर नाहीत तर एक बरा सिनेमा लागलाय तो तरी पहातो.’’ शेवटी आई म्हणाली, ‘‘ठीक आहे. निघा.’’ हा माणूस आमच्या घरातही इतका भिडस्त, की मला जेवायला बोलावून उपाशी पाठवताय याबद्दल सूतोवाच न करता चपला घालून चालायला लागला. मग धावत जाऊन ताईनं त्यांना जिन्यात पकडलं, तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. वरून म्हणतात कसे, ‘‘अग मग आधीच नाही का सांगायचं? मी चक्कर टाकून येतो. तू इतरांना कटव.’’
जेवायला बोलावलेला सद्गृहस्थ न जेवताच बोळवला, तेव्हा आमच्या घरातल्या अतिथ्यशीलतेची एकूण कल्पना बहुधा इतरांनाही आली असावी. मग तेही उठले. अर्ध्या तासानं पानवलकरकाका परत आले. त्यांना आई म्हणाली, ‘‘पानवलकर, तुम्हाला नेहेमीसारखं आज आत न यायला काय झालं?’’ तर ते आईला म्हणतात, ‘‘अहो वहिनी, मी एवढा हुषार असतो तर विजय तेंडुलकर झालो नसतो का?’’

सात जानेवारी, एकोणीसशे पंच्याऐंशीला बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी पानवलकरकाकांना आईनं बोलावलं. योगायोगानं प्रो. म. द. हातकणंगलेकरही मुंबईत होते. तिघे मिळून गप्पा मारत होते, तेव्हा दुरून मी त्यांच्याकडे पहात होते. पानवलकरकाका जवळ असले म्हणजे बाबा एका वेगळ्याच मूडमधे असतात. त्यांच्या चेहेऱ्यावर, बोलण्यात एक वेगळाच मोकळेपणा, आनंद येतो, हे मला त्या संध्याकाळी फार तीव्रतेनं जाणवलं. बाबांच्या सख्ख्या मित्रांमधले श्री. वसंतराव गोडसे आणि प्रा. माधव आचवल फारच कमी अंतरानं अचानक वारले. जायच्या काही दिवस आधीच दोघेही बाबांना भेटून गेले होते. त्यांच्या जाण्यानं बाबांना बसलेला धक्का अजूनही ओसरलेला नाही. ते अचानक एकदम हळवे, खचून गेल्यासारखे होतात. अशा वेळी मला पानवलकरकाकांचा मोठा आधार वाटे. बाबांच्या पुढच्या वाढदिवसाला त्यांचे आणि पानवलकरकाकांचे मित्र अमान मोमीन आले तर बाबांना किती आनंद होईल, असे पानवलकरकाका म्हणाले. आणि ह्या वर्षीच्या बाबांच्या वाढदिवसाला बाबांनी आमच्या कौटुंबिक बैठकीत जाहीर करून टाकलं की, ‘‘या वर्षापासून माझा वाढदिवस साजरा करायचा नाही. कुणीही भेटी आणायच्या नाहीत, कुणालाही जेवायला बोलवायचं नाही. माझा वाढदिवस मी बंट्याला दिला आहे. तो त्याचा म्हणून साजरा करा हवं तर. पण माझा नाही.’’
मला आठवतं तेव्हापासून या वर्षी प्रथमच बाबांचा वाढदिवस आम्ही साजरा केला नाही. पानवलकरकाका असते आणि त्यांना हे कळलं असतं तर ते नक्की म्हणाले असते, काय हे तेंडुलकर! पोरांची मनं दुखवता? अहो त्यांचा आनंद आहे तो. त्या दिवशीसुद्धा ते आईला म्हणाले, ‘‘मजा आहे बुवा तेंडुलकरांची! सगळे लाडच लाड!’’ त्यावर आई त्यांना म्हणाली, ‘‘पानवलकरकाका, तुम्ही लग्न करा बघू!’’ असली संधी ती कधीही वाया जाऊ देत नसे. पानवलकरकाकांचं लग्न लावायचे तिनं अविरत प्रयत्न केले. पण पानवलकरकाकांनी इतर अनेक गोष्टींप्रमाणं त्या बाबतीतही तिचं बोलणं कधीही मनावर घेतलं नाही. ‘‘अहो वहिनी, कशाला चांगल्या बायकांना दुःखी करता?’’
- त्यांचं उत्तर ठरलेलं असे.
मध्यंतरी पानवलकरकाकांना रहायला जागा मिळत नव्हती. तेव्हा आईनं जागेसकट एक बायको त्यांच्यासाठी शोधली होती. त्यावर ते म्हणाले, ‘‘ही जागा फारच महागात पडेल हो मला!’’ आईची मैत्रीण अजूनही त्यांच्यासाठी झुरते आहे असं आई त्यांना म्हणे. तेव्हा ते म्हणत, ‘‘तिला सांगा, मला जागा मिळाली. आता कशाला झुरत्येस?’’
लग्नाबद्दल पानवलकरकाकांची मतं काय होती हे कळण्याइतपत जवळीक आमच्यांत कधीच झाली नाही. पण अलीकडे लग्न कर असं टुमणं त्यांनी माझ्यामागं लावलं होतं. ‘‘आता किती उनाडणार? पुरे आता. लग्न करा.’’ ते मला म्हणत. तेव्हा मी त्यांना एकदा म्हटलं, ‘‘पानवलकरकाका, तुम्ही हे मला सांगताय?’’ तर मला दटावून ते म्हणाले, ‘‘असं मोठ्या माणसांना उलट बोलू नये.’’- झालं! म्हणजे विषयच संपला! पण ते निवृत्त झाल्यावर मला अनेकदा वाटे की त्यांनी एकटं राहू नये. माणसांत असावं. त्यांनी निदान अधूनमधून तरी येऊन रहावं असं आई त्यांना अनेकदा म्हणे. ‘‘येऊ हो, हे काय- माझंच घर आहे,’’ असं ते म्हणत. पण आले कधीच नाहीत. ‘‘ते काय आहे, सकाळी माझा दूधवाला येतो; मग डबेवाला येतो’’ अशी फुसकी कारणं सांगून टाळतच राहिले. हळूहळू पूर्वीसारखं वेळी-अवेळी येणंही त्यांनी बंद केलं. फोन करून मगच येत. मी त्यांना एकदा म्हटलं, ‘‘तुम्ही आता साहेबासारखे फोन करून यायला लागलात.’’ तर मला म्हणाले, ‘‘अग आता तूच सायबीण झाली आहेस. तुझा बाप डोंगराएवढा उंच झालाय. शिवाय माझीही कामं असतात.’’ त्यांची काय कामं होती कुणास ठाऊक; पण हळूहळू त्यांच्यात नजरेत येण्यासारखा बदल घडत जातोय असं मला जाणवत राहिलं. पूर्वीचे आडदांड हीरोसारखे दिसणारे पानवलकरकाका आता फार कृश, काळवंडलेले दिसू लागले. आरामात जाजमावर बसायच्याऐवजी कोचावर पाय सतत हलवत अवघडून बसू लागले. अधिकच खोल रुतत चालल्यासारखे, आपल्याआपल्यातच असल्यासारखे राहू लागले. आमच्यांतलं अंतर कुठंतरी आणखी वाढतंय असं मला वाटू लागलं. त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करून पाहिला, तर ते आणखीनच दूर जात आहेत असं मला वाटू लागलं. आमच्या गच्चीत त्यांनी फिल्मफेअर अवॉर्डची पार्टी दिली, तेव्हा तर मला हे सगळं अधिकच जाणवलं. त्या रात्री ते सगळ्यांच्यात असूनही नसल्यासारखे होते. निदान माझ्यापुरते तरी. त्या पार्टीत झालेल्या खर्चाचा काटेकोर हिशेब मागून त्यांनी एकेक पैसा चुकता केला. आम्ही अवघडून नाकारत राहिलो; तर म्हणाले, ‘‘मोठ्या आल्या पैसेवाल्या! कडेवर घेऊन फिरवलंय तुम्हाला. काकासमोर पैशाच्या गोष्टी करता?’’ आणि एके दिवशी जया दडकरांचा फोन आला : ‘‘पानवलकर हॉस्पिटलमधे आहेत. मी तुम्हाला फोन केला असं त्यांना सांगू नका. त्यांना आवडणार नाही.’’ बाबा अमेरिकेत होते. ताई सकाळी जाऊन त्यांना भेटली- ती रडतच घरी आली. मी दुपारी गेले, तर मला पाहून म्हणाले, ‘‘अरे, तू? तू का आलीस तुझी कामं टाकून? तुम्हाला कुणी सांगितलं मी इथं आहे ते? जा, घरी जा. आणि आईला येऊ देऊ नका. बाबा नाहीत इथं. तुम्ही तुमची कामं करा.’’ मी आणि तनुजा मुकाट उभ्या राहून ऐकत राहिलो. सरकारी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डला जोडलेल्या एका खोलीत त्या कॉटवर पानवलकरकाका झोपले होते. अंगात हॉस्पिटलचा ढगळ, बटणं तुटलेला शर्ट आणि अर्धी चड्डी. पाय सुजून मूळ आकाराच्या दुपटीनं मोठा झालेला. कॉटवरच उशाशी एक जुनी बॅग. मी त्यांना विचारलं, ‘‘किती दिवस इथे आहात?’’
‘‘सहा-सात दिवस झाले. पण तू आता जा.’’ ते मला म्हणाले.
तितक्यात एक नर्स आली.
‘‘श्रीकृष्णा, दवा खाया? नवा दवा लाया?’’
मी तिला विचारलं, ‘‘किती दिवस आहेत हे इथे?’’
‘‘हुआ एक महिना. तुम कौन?’’ तिनं मला विचारलं.
‘‘ये मेरे चाचाजी है.’’ मी म्हटलं. इतके दिवस हा चाचाजी इथे पडून असताना एकदाही न फिरकलेली ही कोण पुतणी आली असा कटाक्ष माझ्याकडे टाकत ती पानवलकरकाकांना म्हणाली, ‘‘श्रीकृष्णा, पैसा दो. वॉर्डबॉयको भेजता है दवा लानेके लिए.’’
पानवलकरकाकांनी धडपडत बॅग उघडली. आतल्या वस्तू कुणालाही दिसणार नाहीत अशी ती उघडून आतले पैसे काढले. एकच नोट आहे ना याची पुन्हापुन्हा खात्री करून घेऊन त्यांतली दहाची नोट नर्सला दिली. मग बॅग बंद केली. प्रयत्नपूर्वक कॉटवरून उतरले. मी त्यांना धरायचा प्रयत्न केला, तर म्हणाले, ‘‘नको. मला सवय आहे.’’ बँडेजच्या बाहेरही जखमेतला स्त्राव गळत असलेला तो भप्प सुजलेला पाय जमिनीवर टेकवत-टेकवत ते हातात बॅग घेऊन निघाले.
‘‘कुठे चाललात?’’ मी विचारलं.
‘‘संडासात जाऊन येतो.’’ ते म्हणाले.
‘‘बॅग घेऊन?’’ मी विचारलं.
‘‘इथं कशी ठेवणार? कुणी नेली तर? पैसे आहेत ना तिच्यात.’’ ते म्हणाले.
‘‘माझ्याकडे द्या.’’ मी म्हटलं.
‘‘नको. तू काय रोज असणार आहेस? तू घरी जा. मी जाऊन येतो.’’
हातात बॅग घेऊन, बँडेजमधला पाय टेकत-टेकत टॉयलेटमधे जाणारे पानवलकरकाका पाहून मला माझा राग आला, शरम वाटली. मराठीतला हा एवढा मोठा लेखक- ज्याच्या कथेवर निघालेला चित्रपट देशभर असंख्य लोकांनी पाहिला, वाखाणला. लाखो रुपयांचा धंदा त्या चित्रपटानं केला. कस्टम्समधे फोरस्ट्रायपर म्हणून अधिकाऱ्याच्या पदावरून निवृत्त झालेला, मला कडेवर घेऊन खेळवलेला, मला उत्तमोत्तम भेटवस्तू देऊन माझे लाड केलेला हा माझा काका महिनाभर या सरकारी हॉस्पिटलात अर्धी चड्डी आणि बटणं तुटलेला शर्ट पेहरून, कुठल्या कोणा नर्सचा श्रीकृष्णा होऊन गेला महिनाभर पडून आहे; आणि मला त्याचा पत्ताही नाही! माझ्या वडिलांना जन्मभर भक्कम साथ आणि सच्ची दोस्ती दिलेला त्यांचा हा एकुलता एक सख्खा मित्र स्वतःचा खर्च स्वतः करत, इतक्या वेदना शांतपणं सोसत इथं एकटा पडून आहे; आणि बाबांच्या अनुपस्थितीत अख्खा महिनाभर एक फोन करून त्यांची साधी विचारपूसही करायचं मला सुचलं नाही! बाबा निघायच्या आधी वेड्यासारखे त्यांना परतपरत फोन करत होते, तेव्हा ते झोपले आहेत असं त्यांचे शेजारी सांगत होते.
सकाळी उठून पानवलकरकाकांनीच फोन केला, तेव्हा बाबा गेले होते आणि मीही घरी नव्हते. नंतर पूर्ण महिनाभर त्यांची साधी खुशालीही मला कळली नाही. मी शांतपणं माझे व्यवहार करत राहिले. आणि इतक्या आजारातही, बाबा घरी नाहीत, तेव्हा आमची धावपळ होऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून हा माणूस आल्यागेल्याला आम्हाला कळवू नका म्हणून बजावत होता! शेवटी न राहवून जया दडकरांनी फोन केला, म्हणून आम्हाला कळलं. नाहीतर अजूनही  आम्ही सुखरूपपणं आमची आयुष्य जगत राहिलो असतो!
त्या दुखण्यात पानवलकरकाकांना विलक्षण वेदना झाल्या असणार. पण त्यांनी कधीही तक्रार, आरडाओरडा केला नाही. एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारखे ते शरीर आपलं नसल्यासारखे पडून असत. कधी ते म्हणत, ‘‘मी या हॉस्पिटलमधे गेली सहा वर्षं पडून आहे. आता मला बाहेर काढा रे.’’ तर कधी म्हणत, ‘‘एक आठवडा झाला इथं येऊन. आता दोन-तीन दिवसांत बाहेर पडेन. कामं केवढी आहेत! राज्य पारितोषिक-मंडळाची पुस्तकं वाचायची आहेत. माझ्या पुस्तकाची प्रुफं तपासायची आहेत.’’ मी त्यांच्याशी हुज्जत घालत बसे. मग ते माझ्यावर चिडत : ‘‘तू जा बघू इथून. मोठी आलीय माझी सासू!’’ मग डॉक्टरांनी मला सांगितलं की, ‘‘त्यांची स्मृती धूसर झाली आहे.’’ मला हे आधी कळलंच नाही. मी त्यांना हवं-नको विचारत राहिले, लाड करू पाहिले, की त्यांना अजिबात आवडत नसे. ‘‘मी उत्तम आहे; मला काहीही नको; तुम्ही विनाकरण त्रास घेऊ नका.’’ म्हणत. त्यांच्या खूपच मागे लागलं की एखाद्या लहान मुलासारखे म्हणत, ‘‘माझ्यासाठी काय आणायचं सांगू? कार्ली गोल कापून परतलेली भाजी आणि दोन फुलके. दोनच हां! जास्ती नको. म्हणजे जमलं तरच हां! आणि बंट्याला आणा. त्याला बघायचंय.’’ त्यांना खाव्याशा वाटणाऱ्या वस्तू मिळाल्या की, ‘‘व्वा! काय झकास आहे, मजा आला,’’ असं म्हणत. लहान मुलासारखे उजळून जात. दोन घाससुद्धा त्यांना जात नसत. पण कौतुक केवढं! सरकार हॉस्पिटलमधून ते दादरच्या शुश्रूषामधे आले तेव्हा श्रमानं विलक्षण थकले होते. चिडचिडे झाले होते. अर्धवट गुंगीत होते. पण तशातही धडपडत त्यांनी त्यांच्या त्या बॅगेतून पैशाची पुरचुंडी काढली आणि बऱ्याचशा नोटा माझ्या हातात खुपसत म्हणाले, ‘‘हे ठेव. खर्चाला लागतील.’’
त्यांनी जोडलेली मोजकीच मित्रमंडळी इतकी जिवाभावाची होती. श्री. व सौ. धोंड, भागवत, दडकर, पानवलकरकाकांचे भाऊ आणि वहिनी यांनी पानवलकरकाकांना बरं करण्यासाठी अतिशय मेहेनत घेतली. आसपास माणसं असली की ते लवकर सुधारतील असं नुसतं डॉक्टरांनी म्हटलं तर मंडळी पाळ्या लावून त्यांच्या जवळ बसून रहात. श्री. व सौ. धामणस्करांचं पानवलकरकाकांवरचं प्रेम आणि त्यांनी त्यांच्या आजारपणात घेतलेले श्रम पाहून तर वाटायचं : असे शेजारी फक्त पानवलकरकाकांनाच लाभू शकतात. त्यांच्यावर उपचार करणारी डॉक्टरमंडळी तर पानवलकरकाकांची इतकी चाहती होती, की डॉ. अवस्थी सायन हॉस्पिटलमधली आपली ड्यूटी संपवून आपल्या नियोजित डॉक्टर वधूसह शूश्रुषामधे येत. पानवकरकाकांना भेटत. तिथल्या डॉक्टरांशी त्यांच्या तब्येतीवर विचारविनिमय करत. ‘‘तुम्ही केवढा त्रास घेता’’ असं मी त्यांना एकदा म्हणाले, तर ते मला म्हणाले, ‘‘हा माणूसच एवढा मोठा आहे, की त्याच्यासाठी मी जे करतो आहे ते काहीच नाही.’’ आसपासच्या रुग्णमंडळींच्यातही पानवलकरकाकांच्या येण्यानं नवा उत्साह संचारला होता. पानवलकरकाकांना स्वतंत्र खोलीत हलवलं तर ही सगळी मंडळी अगदी व्हीलचेअरवरूनही येऊन त्यांना भेटून जात. पानवलकरकाका गुंगीत असतानाही बाबांबद्दल बोलत ‘‘मोठा लेखक! या हो आता. किती दिवस रहायचं?’’ असं म्हणत रहात. एकदा तर भडकून मला म्हणाले, ‘‘तुझा बाप स्थायिक झाला की काय अमेरिकेत? बाबांनाही अमेरिकेत काय संकेत आले कोण जाणे!’’ पानवलकरकाकांच्या आजाराची बातमी त्यांना सांगितली नव्हती. तरीही फोनवरून मला अनेकदा, पानवलकर कसा आहे? त्याला भेटलीस का?’ असं विचारीत रहात. ते आल्या दिवशी पहाटेच मी त्यांना पानवलकरकाकांच्याबद्दल सांगितलं. मग बाबा सकाळ व्हायची वाट पहात न झोपता बसून राहिले आणि उजाडताच हॉस्पिटलमधे पोचले.

तिथून पुढं पानवलकरकाकांच्या पायावरची सूज उतरली, जखम भरत आली, स्मरणशक्ती पूर्ववरत झाली. ते इतके टवटवीत झाले, की आपल्या पायांनी चालत हॉस्पिटलमधे हिंडून-फिरून इतर रुग्णमंडळींची विचारपूसही करू लागले. आणि एका पहाटे आगगाडीत बसून त्यांच्या भाऊ-वहिनींबरोबर ते सांगलीला रवाना झाले. त्यांना स्टेशनवर पोचवून बाबा घरी आले, तेव्हा ते फार अस्वस्थ होते. मी त्यांची समजूत काढण्यासाठी म्हटलं, ‘‘घरी राहून चांगली विश्रांती घेऊन ते पूर्वीसारखे होतील. मग त्यांना आपल्या घरी हट्ट धरून रहायला आणू.’’
बाबा गप्पच राहिले.
मग पानवलकरकाकांचं एक पत्र आलं. अक्षर पार वेडंवाकडं असलेलं. त्यांच्या कथेची मूळ प्रत कशी उभट, सडपातळ, रुबाबदार अक्षरांच्या सुबक ठेवणीची असायची. सही तर काय डौलदार करायचे. बाबांनी आणि त्यांनी एकमेकाला लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधे बाबांची तुमचा तें अशी बारीक किरट्या अक्षरांतली सही असायची; आणि पानवलकरकाकांची तुमचा श्री. दा. पानवलकर अशी ऐटबाज भलीभक्कम सही असायची. त्यावर पानवलकरकाका म्हणायचे, ‘‘अग, मोठ्या लेखकाची छोटी सही आणि छोट्या लेखकाची मोठी सही!’’ बाबांना हे सांगितलं, तर बाबा डोळे मिचकावून म्हणाले, ‘‘चावट आहे!’’

आणि एक दिवस बातमी आली की पानवलकरकाका गेले. ते सिरिअस असल्याचं कळलं होतं. प्रो. हातकणंगलेकर पत्रांतून नियमितपणं त्यांच्या हालचाली कळवीत असत. ते जायच्या आदल्याच दिवशी भल्या सकाळी उठून मी पाहिलं, तर बाबा डायनिंग टेबलावर एकटेच खिडकाली कळवीत असत. ते जायच्या आदल्याच दिवशी भल्या सकाळी उठून मी पाहिलं, तर बाबा डायनिंग टेबलावर एकटेच खिडकीबाहेर पहात बसले होते. बाहेर पाऊस पडत होता.
‘‘कसला विचार करता आहात?’’ मी विचारलं.
‘‘पानवलकरचं काही खरं दिसत नाही.’’ ते तसेच दूर पहात म्हणाले, आणि घाईनं उठून निघून गेले.
मग शास्त्राप्रमाणं त्यांचे फोटो वर्तमानपत्रांत छापून आले. काहीबाही लिहून आलं. बाबांनाही काही बोलावं, श्रद्धांजली वाहावी म्हणून फोन आले. बाबा काहीही बोलले नाहीत. त्यांच्याबद्दल लिहिलेल्या बातम्या आणि लेखांचं एकूण स्वरूप बघून मी बाबांना म्हटलं, ‘‘ही डिझर्व्ह्ड् मच मोअर.’’ तर ते शांतपणे म्हणाले, ‘‘अग, तो जिवंत असताना डिझर्व्ह्ड् मच मोअर. आता मेल्यावर नाही मिळालं म्हणून काय दुःख करतेस?’’
आत्ता मी लिहिते आहे तसं अनेकांनी अक्षरशः काहीही लिहायचा सपाटाच लावला होता. त्यांतल्या एका जयप्रकाश कुलकर्णी नावाच्या माणसानं तर कळसच केला. तेव्हा बाबांना स्वस्थ रहावेना. सकाळीसकाळी वर्तमानपत्र वाचल्यावर लगेच त्यांनी संपादकांना एक पत्र लिहिलं. मला म्हणाले, ‘‘हातात लेखणी घेतली की कुणाच्याही आयुष्यावर कशाही पद्धतीनं लिहायचा अधिकार कसा येतो या माणसांना? माझा मित्र होता म्हणून मला यातना झाल्या; पण इतरांनी चवीनं वाचलंच असेल ना?’’
आता मी लिहित्येय त्याच्यावरही त्यांची प्रतिक्रिया काय होणार आहे, कोण जाणे! ‘पानवलकर या विषयाबद्दल ते अलीकडे फारच पझेसिव्ह झाले आहेत.
पण पानवलकरकाका गुंगीत असतानाही मला अनेकदा सांगत, ‘‘मनापासून लिहावंसं वाटेल तेव्हाच लिही. उगाच लिहायचं म्हणून, कुणी मागितलं म्हणून किंवा पैशासाठी लिहू नकोस.’’
मला फार मनापासून लिहावंसं वाटलं म्हणूनच मी हे सगळं लिहिलं. पानवलकरकाकांना आवडणार नाही, तरीही लिहिलं. यावर पानवलकरकाकांची प्रतिक्रिया काय असती याचा फार तर अंदाज मी करू शकते. आयुष्यात सोसलेल्या इतर अनेक त्रासांप्रमाणं हाही त्रास त्यांनी मुकाट सहन केला असता. त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीनं फार तर एवढंच म्हणाले असते, ‘‘काय. . . . चालायचंच. . .  .’’ 
 

Wednesday, July 6, 2011

दुभंग

- सरोजिनी वैद्य

पानवलकर (एक)
श्री. दा. पानवलकरांच्या आणि माझ्या परिचयाला दहाबाहा वर्षं तरी झाली असावीत. एकदा थोडीशी ओळख होताच आमचं नातंही ठरून गेलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आणि लहरीनं जीवनाच्या अनेक बऱ्यावाईट चढउतारांतून जायचं; आणि इतर अनेकांप्रमाणं मीही ते दुरून एखाद्या प्रेक्षकासारखं बघायचं; कधी तरी आठपंधरा दिवसांनी विद्यापीठातील माझ्या कार्यालयात त्यांनी यायचं आणि ते ज्या विषयांवर, ज्या अनुभवावर बोलतील ते मी नुसतं समजुतीनं ऐकायचं... स्नेहाच्या या रीतीचा आणि गतीचा पानवलकर हयात होते तोपर्यंत माझ्याकडून फारसा कधी विचार झाला नाही. ती त्यांच्या सरळ आणि तेवढ्याच क्लिष्ट भासणाऱ्या व्यक्तित्वाची एक स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे, एवढंच मला वाटत राहिलं.
प्रेक्षकाच्या आणि श्रोत्याच्या या माझ्या भूमिकेला थोडा खळ पडायचा तो पानवलकर जेव्हा दोनतीन महिने अजिबातच फिरकत नसत, तेव्हा. मधल्या काळात त्यांचं एखादं गंभीर आजारपण झालेलं असायचं किंवा कधी ते त्यांच्या घरी सांगलीला, देवासला कुमार गंधर्वांकडे, कुठंतरी मित्रमंडळींच्याकडे गेलेले असायचे. पण हा मधला काळ जसा काही वगळला गेलेलाच नाही अशा सहजतेनं डोक्यावरची पांढरी टोपी आणि खांद्यावरची शबनम बॅग सावरीत ते परत विद्यपीठाकडे येऊ लागले की रेखीव सुंदर अक्षरातलं स्वतःचं काही नवं लिखाणही आपण होऊन वाचायला द्यायचे. त्यावर आपण छान आहे एवढी छोटीशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती त्यांना पुरायची. मी मनात म्हणायची, चला, म्हणजे क्षणोक्षणी बिथरणाऱ्या पानवलकरांचा आपल्याविषयी काही गैरसमज झालेला नाही. मग काही दिवस तेही पुन्हा उत्साहानं माझ्या चाकोरीबद्ध शिक्षकी आणि संसारी जीवनाला थोडंसं डिवचत. ‘‘तुम्हाला का..य माहिती आहे....’’ अशा अधिक्षेपाच्या सुरात आपण वेळोवेळी कथारूप दिलेल्या उग्र, बेबंद जीवनाच्या आणि वाचलेल्या साहित्याच्या हकीकती बोलू लागायचे.
बोलणं ऐकण्यासारखं तर खूप असायचं. सांगायच्या नाट्यमयतेचा झटका त्यांना भुलवीत असायचा. ऐकणाराला अपरिचित असणारं आपण सांगत आहोत ह्यात पानवलकर खूष असायचे. . . . कधी वाटायचं, हे वास्तव टिपताटिपता त्यांच्या नजरेत थोडंअधिक सेन्सेशनल तर झालेलं नाही? पाश्चात्य जगातील हेमिंग्वेच्या प्रतिभेचं अनुकरण तर नाही? पण श्रोत्याची भूमिका सोडून मी त्याबाबत कधी वाद केला नाही किंवा सलगतेनं चर्चाही केली नाही. इथं त्याचा फारसा उपयोग नव्हताच.
साहित्याबद्दलचे, जीवनाबद्दलचे ते सगळे अभिप्राय ऐकताना मी मनातल्या मनात एकीकडे मिस्किलपणं पानवलकरांना सुखावणारा त्यांचा अहंभाव न्याहाळायची; दुसरीकडे एखाद्या वृक्षाच्या कोवळ्या कंदासारखं असावं तसं असणारं या माणसाचं कोमलपण दगडासारखा कठीण आकार कसा धारण करीत गेलं आहे त्याची प्रक्रिया पहात असायची; आणि तिसरीकडे चारचौघांसारखं आयुष्य न काढल्यानं आपल्या सामाजिक व्यवहारात पुरुषालासुद्धा जे अवघडलेपण अनुभवावं लागतं तेही टिपत असायची. . . . पानवलकरांचं बोलणं ऐकणं आणि माझं त्यांना समजून घेणं असं दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर चालायचं. कथालेखक असणाऱ्या पानवलकरांनाही ते समजत असावंच. पण असं स्वतःला टाळत रहाणं त्यांना कदाचित अटळच असावं. अधूनमधून या पद्धतीनं भेटणारे पानवलकर शेवटचे कधी भेटले ते आज मला प्रयत्न करूनही आठवत नाही. . . . त्यांच्या सगळ्या झालेल्या गाठीभेटी बाह्यतः तरी मला एकसारख्याच, आता मी वर्णन करते आहे तशाच काहीशा कॅज्युअल स्वरूपाच्या दिसत आहेत. ह्याला अपवाद फक्त एका प्रसंगाचा आहे. तो मात्र मला स्पष्टपणं आठवतो. एक दिवस त्यांच्या एका मित्रासमक्षच मी त्यांना माझं प्रेक्षकपण पूर्णपणानं टाकून देऊन, त्यांनी स्वतःच्या जगण्याविषयी सावध व्हावं म्हणून थोडं समजुतीनं आणि थोडंसं चिडून भरपूर बोलून घेतलेलं होतं. त्या दिवशी श्रोत्यांची भूमिका पानवलकरांची होती. एखाद्या बनेल लहान मुलासारखं त्यांनी माझं सगळं बोलणं मुकाट्यानं खाली मान घालून ऐकून घेतलं. बोलण्याचा काही उपयोग नाही हे मी मनातून ओळखावं ह्याच पद्धतीनं त्यांच्या सूज आलेल्या, भरणाऱ्या आडमाप पायांकडे बघत ते मुकाट्यानं समोर बसले होते. माझा अनावर आवेग ओसरल्यावर मीही सुन्नपणानं बोलण्याची थांबले. काहीतरी विषयान्तर करून पुन्हा मूळपदावर आले. त्यानंतर काही महिन्यांतच पानवलकर गेलेही.
कस्टम्समधून सेवानिवृत्त होण्यापूर्वी पानवलकरांचं कार्यालय काही काळ माझ्या विद्यापीठाच्या कार्यालयाच्या आसपास, फोर्ट भागात कुठंतरी आलेलं होतं. या काळात कधी वर्गातलं व्याख्यान संपवून मी खोलीत यावं, तर एखादं पुस्तक वाचत समोरच्या खुर्चीवर बसलेले पानवलकर दिसायचे; कधी ते आसपासच्या इतर प्राध्यापकांशी गप्पा मारण्यात रंगलेले असायचे; कधी मधल्या वेळी आले आणि आम्ही आमचे डबे उघडलेले असले की त्यात सहभागी व्हायचे. जन्मभर जेवणाच्या बाबतीत खाणावळीशीच संबंध आलेला असल्यानं एखाद्या साध्यासुध्या पदार्थाच्या चवीचीही अपूर्वाई त्यांना विशेषच वाटायची. मग त्यांनी खूप आवडलं असं म्हणताच मला आणि उषाताई देशमुखांना एकदम उदारतेचा झटका यायचा. आपल्याला भूक नाही असं दाखवून त्यांना तो पदार्थ देण्याची आमची दोघींचीही धडपड चालायची. पण पानवलकर अशा क्षणाला एकदम सावध व्हायचे. अवघडून जायचे. ते पदार्थ खाताखाताच अर्धवट हसत, अर्धवट गंभीरपणानं स्वतःची वेगवेगळ्या प्रसंगांतील बदनामी सांगायला लागायचे. लहानपणी खाण्याची, पोहण्याची, वांडपणाची केलेली बदनामी. . . . पानवलकरांचं हे दुसरं रूप मला ऐकून थोडं माहितीही होतं. पण कुणी काही जाब विचारलेला नसतानाही कशाची तरी कबुली दिल्यासारखे ते म्हणायचे, ‘‘हां.. आम्ही तशी बदनाम मंडळी. . . हां. . लक्षात असू द्या.’’
त्यांच्या या शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही असं ठरवून हे प्रश्न तडीला न नेता विषयान्तर करणं भागच असे. तेच आम्हीही करीत असू.
कधी हे बदनामपण आम्हालाही काही कमी गुंड समजू नका अशा पराक्रमी वृत्तीच्या थाटातसुद्धा पानवलकर व्यक्त करीत. कधी परिस्थितीच्या खोड्यात सापडलेल्या माणसानं अपराधी भावनेनं स्वतःशी पुटपुटावं तसंही खूप काहीतरी मौल्यवान गमावल्याच्या सुरात ते प्रकट होई. पानवलकरांच्या वय आणि व्यवसायपरत्वे निबरट होत गेलेल्या चेहेऱ्यामोहऱ्याशी त्यांचा पहिला पवित्रा जुळायचा; दुसरा काहीसा विसंगत वाटायचा. पण तोही पार खरा होता. आज तोच मला जास्त आठवतो आहे.
हे दुसरे पानवलकर अनपेक्षितपणं एखाद्या प्रसंगात मधेच दिसायचेही. एक दिवस रुपारेल कॉलेजपाशी रहाणाऱ्या प्रा. मा. श्री. विद्वांस यांच्याकडे मी काही कामासाठी निघाले होते. त्यांच्या घराच्या आसपास असणाऱ्या सिनेमा-थिएटरपाशी पानवलकर मला दिसले. मी त्यांना माझ्याबरोबर विद्वांसांच्या घरी चलण्याचा आग्रह केला. आणि थोडेसे संकोचून ते आलेही. प्रा. विद्वांस हे कै. श्री. रमाबाई रानडे यांचे वयोवृद्ध नातू. रमाबाईंचं चरित्र लिहिण्याच्या कामात मोठ्या श्रद्धेनं गुरफटलेले. पानवलकरांची विद्वांसांच्या घरातील सर्व मंडळींशी मी ओळख करून दिली, आणि विद्वांसांनी केलेलं काही लेखन मला वाचून पहायचं होतं, त्याकडे वळले. घरातील मंडळींनी पानवलकरांचं स्वागत त्यांच्या नेहेमीच्या सुसंस्कृत पद्धतीनं, मोठ्या आदबीनं आणि अगत्यानं केलं. पानवलकर जवळजवळ मूकपणानंच ते सर्व वातावरण अनुभवत बसलेले होते. तासाभरानं काम संपवून आम्ही त्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा पानवलकरांचे डोळे डबडबून आले होते. ते माझ्या ध्यानात येऊ नये अशा पद्धतीनं पुसत पानवलकर म्हणाले, ‘‘देवळात जाऊन आल्यासारखं वाटलं हो!’’ हा शेवटचा हो म्हणजे त्यांच्या मानसिक अवघडलेपणातून आलेली त्यांची एक खास लकब!
आवडलेल्या साहित्याचं किंवा चित्रपटाचं सौंदर्य सांगतानाही पानवलकरांची या प्रकारच्या चांगल्या जीवनाची ओढ नेहेमी दिसे. भावुक, भाबडं, निर्मळ, उदात्त, साधं आणि सुंदर त्यांच्या मनाला पुन्हापुन्हा भुरळ घाली. त्यांच्या पाठांतरात असलेली उपदेशपर पंडिती कविताही ते नीति-उपदेशाच्या आणि घोटीव शब्दकळेच्या आवडीतून रंगून म्हणून दाखवीत. कधी तरी मी रस्त्यानं हेलपाटत चाललेले पानवलकर पाहिलेले होते. त्याच्याशी हे दृश्य अगदी विसंगत असे.
पानवलकरांना मी प्रथम पाहिलं होतं ते एका साहित्यिक कार्यक्रमातच. एकोणीसशे बासष्ट साली मी पुण्याहून मुंबईला रहायला आले. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईच्या वाङ्मयीन वातावरणाचा पहिला परिचय मला झाला तो साहित्य-संघाच्या खुल्या नाट्यगृहात झालेल्या एका परिसंवादाच्या वेळी. संघाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दिवशी ग्रामीण कथेवर चर्चा झाली. त्यात वक्ते म्हणून त्या वेळचे नामवंत कथाकार होते. त्यामुळं त्या व्याख्यानाला गर्दीही बरीच होती. पाचव्यासहाव्या रांगेत बसून एक मोठ्या डोळ्यांचा मनुष्य अगदी मन लावून सर्व चर्चा ऐकत असल्याचं व्यासपीठावरून मला दिसत होतं. ब्राँझचा पुतळा असावा तसा त्यांचा सगळा एकात्म आविर्भाव होता. ती तन्मयता सर्व संवेदनशीलता कानांत एकवटून एखादं गाणं ऐकणाऱ्या श्रोत्यासारखीही होती. कार्यक्रम संपल्यावर शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्याशी हस्तांदोलन करून ते गृहस्थ निघून गेले. ते गेल्यावर मिरासदार मला म्हणाले, ‘‘हे श्री. दा. पानवलकर.’’
पुढं पानवलकरांची ओळख झाल्यावर कधी तरी बोलताना या प्रसंगाचा संदर्भ निघाला. पानवलकर म्हणाले, ‘‘मला तुमचं भाषणं त्या दिवशी फार आवडलं होतं. तुम्हाला तसं सांगायचंही होतं. पण भीती वाटली बुवा!’’
त्या दिवशी पानवलकरांच्या त्या भीतीची ती खोटी वाटून मी टिंगलच उडवली. पण आता माझ्या लक्षात येतं आहे की हे त्यांचं बोलणं खोटं नव्हतं. अनेक संदर्भांत अनेक जणांची आणि स्वतःचीही त्याना भीती वाटत असे. खूप दिवसांत विद्यापीठाकडे ते आले नाहीत. आणि त्यांना का आला नाहीत असं आपण विचारलं तर ते अपराधी चेहेऱ्यानं पटकन म्हणायचे, ‘‘भीती वाटली.’’ कुणा मित्राच्या, संपादकाच्या घरी जायची वेळ आली तर तिथं आपलं आगतस्वागत नीट होईल ना या गोष्टीचीही त्यांना भीतीच वाटायची. मी माझ्या विद्यापीठातील ग्रंथालयात त्यांना लिहायला वाचायला बसता यावं म्हणून ग्रंथपालांची परवानगी घेऊन तिकिट काढून दिलेलं होतं. राजाबाई टॉवरमधील ग्रंथालयाचं भव्य आणि उदात्त वातावरण पाहून त्यांनी पहिला उद्गार काढला होता- ‘‘भीती वाटते हो!’’
पानवलकरांच्या दुभंगलेल्या आणि परिस्थितीनं जखमी केल्यावर कोलमडत गेलेल्या आयुष्याचा आविष्कार कदाचित या उद्गारांमधे दडलेला असावा. सांगलीमधील त्यांचं आईवडिलांच्या छत्राखाली गेलेलं ब्राह्मणी विद्यार्थिजीवन, त्यांच्या मनात ज्या स्वप्नांची आणि संस्कारांची पेरणी करून गेलेलं होतं, त्यानं पुढच्या काळातील त्यांच्या जीवनाशी सदैव संघर्षच चालू ठेवलेला होता. तिथं मॅट्रिकपर्यंत संस्कृतचा अभ्यास मोठ्या गोडीनं त्यांनी केला होता, तोही ते कधी विसरले नव्हते. प्रा. वसंत बापट भेटले की विद्यपीठात दोघांच्या संभाषणात नेहेमी त्याला उजळा मिळे. सांगलीच्या शाळेत भेटलेल्या उत्तम शिक्षकांची आठवण तर आमच्या ह्या विद्यार्थिजगतात आल्यावर त्यांना बऱ्याचदा होई. पण वडिलांच्या मृत्यूनंतर लहान वयातच घरातल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या, आणि स्वतःचं शिक्षण थांबवून वेगवेगळ्या नोकऱ्या धुंडाळत त्यांना जावं लागलं. या नोकऱ्यांमधेसुद्धा मुंबईत पहिला काही काळ त्यांनी संस्कृतच्या शिकवण्याच धरलेल्या होत्या! पण मग पानवलकरांचे अनेक व्यवसाय झाले. त्या-त्या धंद्यात जे वातावरण असतं त्याचा एक भाग झाले. तो सांगलीतला मध्यमवर्गीय, हुशार, महत्त्वाकांक्षी, भाषाप्रेमी ब्राह्मण हळूहळू जीवनाची निबरट आणि चरबट रूपंही आपलीच म्हणून स्वीकारून केवळ व्यावहारिक बस्तान बसवीत बसला. त्या प्रकारच्या जगण्याच्या आधारावर शहरात उभं रहाता आलं. बहिणींची लग्नं आटोपली. भावाचा संसार सुरळीत सुरू झाला. पण भाषेच्या प्रेमात आणि लेखनाच्या ऊर्मीत जिवंत राहिलेली सदसद्विवेकबद्धी काही झोपी गेली नाही. मग नंतरच्या काळात पूर्वाश्रमीचे सांगलीतील पानवलकर आणि नंतरचे मुंबईतील पानवलकर एकमेकांशी भांडत, चिडतच जगले. वास्तविक अशाच परिस्थितीच्या अडचणींमधून जाणारी माणसं कितीतरी असतात. स्वतःचाय सदसद्विवेकबुद्धीशी भक्कमपणे तडजोड करून ती मोकळी तरी होतात किंवा मनोबळाच्या जोरावर घसरताघसरता लवकर सावरतातही. पण पानवलकरांचं मात्र स्वतःला सावरू पहाणं आणि त्यापासून ढळणं शेवटपर्यंत थांबलंच नाही. कधी स्वतःला अपात्र म्हणून छेडत रहायचं; कधी आपला अपमान झाला असं मानून अवास्तव हळवेपणानं दुसऱ्याशी वाकडंतिकडे भांडत रहायचं. एखाद्या क्षुद्र घटनेतून गैरसमजांची मालिका निर्माण करायची आणि परिणामतः शेवटी स्वतःच्याच आयुष्यावर तीक्ष्णपणानं चिडून उठायचं. स्वतःला आधार हवा म्हणून मोहवशतेचंही रंगेलपणानं तत्त्वज्ञान बनवायचं. . . . धिटाईच्या आणि धट्टपणाच्या कथा सांगणाऱ्या या संवेदनशील माणसाच्या मनातलं भय ह्या दुभंगलेपणातून तर निर्माण झालेलं नसेल?
एवढं खरं की पानवलकरांच्या कथेमधेसुद्धा भयाची जाणीव कित्येकदा फार हळव्या आणि दुखऱ्या संदर्भात आलेली दिसते.
पानवलकर विद्यापीठात येत असत त्याच काळात त्यांचा एका नृत्याचा जन्म हा कथासंग्रह एम्.ए.चे विद्यार्थी अभ्यासत होते. पानवलकरांना कुणा प्राध्यापकांनी हे सांगितलं, तेव्हा ते मोठ्या उदासपणानं हसले होते.
सांगलीतील जीवनाचा आणखी एक संस्कार पानवलकरांच्या बोलण्यातून नेहेमीप्रमाणंच अवघडलेपणानं प्रकट व्हायचा. लहान मुलं, संसारी स्त्री, नातेवाइकांसह असणारं एखादं मोठं कुटुंब, घरंदाजपणा, चांगल्या रीतिभाती आणि अस्सल धार्मिक जीवन यांबद्दलची ओढ एखाद्या स्वप्नासारखीच नजाकतीनं त्यांनी जोपासलेली जाणवायची. चारपाच वर्षांपूर्वी मौजेच्या दिवाळी-अंकात सहधर्मचारिणी या लेखात कै. श्री. रमाबाई रानड्यांचं न्यायमूर्तींच्या मृत्यूनंतरचं गृहजीवन सविस्तरपणं आलेलं होतं. त्या लेखावरील प्रतिक्रिया सांगताना पानवलकर मला म्हणाले, ‘‘अहो, तो लेख वाचण्यात अगदी रंगून गेलो होतो; पण मधेच एकदम दचकलो. मला वाटलं, हा लेख लगेच संपणार तर नाही ना? भराभर पुढची पानं उलटून पाहिली तर लेख आणखी बराच होता. मग जीव खाली पडला. लेख पुन्हा शांतपणानं प्रथमपासून वाचला.’’
पानवलकर (दोन)
स्वतःच्या जवळच्या कुटुंबियांबद्दलसुद्धा पानवलकरांच्या मनात नुसतीच कर्तव्यबुद्धी नव्हती. त्यांचं सुख पहाण्यात कर्तेपणाचा आनंदही होता. ते कधी आपल्या घराबद्दल फार सविस्तर बोलल्याचं मला आठवत नाही. पण एकदा ते मुद्दाम विद्यापीठात आले होते आणि काहीशा संकोचानं मला म्हणाले होते, ‘‘बाई, माझं एक काम तुम्ही कराल का?’’
मी विचारलं, ‘‘काय?’’
पानवलकर उत्तरले, ‘‘कालच मी पुण्याहून भाचीचं लग्न ठरवून आलो. याद्या वगैरे झाल्या. आठ दिवसांनी लग्न आहे. भाचीला मी महटलंय, तुला छान हिरव्या रंगाची भारदस्त इंदुरी साडी देतो. आमच्या घरातली फार गुणी मुलगी आहे ही. पण इथं दुकानात गेलो, अन् कोणती इंदुरी हेच कळेना. मला जरा मदत करता का?’’
दुकानात पानवलकरांनी साडी तर घेतलीच; पण तिथून बाहेर पडताच त्याबरोबर देण्यासाठी खण, नारळ हेसुद्धा घेऊन ठेवलं.
माझ्या लक्षात आहेत ते हे श्री. दा. पानवलकर. संसाराचं कसलं लचांड आपल्यामागं नाही म्हणून स्वतःच्या सडेफटिंगपणाबद्दल व खरं खुषीत गरजणारे आणि दुसरीकडे संसारी माणसापेक्षाही अधिक विवशतेनं आत्मीयतेच्या पिंजऱ्यात सतत अडकलेले. . . . त्यातच स्वतःभोवती गरगरत राहिलेले. . . . स्वतःमधील दरी बुजवण्याच्या प्रयत्नात मृत्यूच्या दिशेनं फेकले गेलेले.