Wednesday, July 6, 2011

दुभंग

- सरोजिनी वैद्य

पानवलकर (एक)
श्री. दा. पानवलकरांच्या आणि माझ्या परिचयाला दहाबाहा वर्षं तरी झाली असावीत. एकदा थोडीशी ओळख होताच आमचं नातंही ठरून गेलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आणि लहरीनं जीवनाच्या अनेक बऱ्यावाईट चढउतारांतून जायचं; आणि इतर अनेकांप्रमाणं मीही ते दुरून एखाद्या प्रेक्षकासारखं बघायचं; कधी तरी आठपंधरा दिवसांनी विद्यापीठातील माझ्या कार्यालयात त्यांनी यायचं आणि ते ज्या विषयांवर, ज्या अनुभवावर बोलतील ते मी नुसतं समजुतीनं ऐकायचं... स्नेहाच्या या रीतीचा आणि गतीचा पानवलकर हयात होते तोपर्यंत माझ्याकडून फारसा कधी विचार झाला नाही. ती त्यांच्या सरळ आणि तेवढ्याच क्लिष्ट भासणाऱ्या व्यक्तित्वाची एक स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे, एवढंच मला वाटत राहिलं.
प्रेक्षकाच्या आणि श्रोत्याच्या या माझ्या भूमिकेला थोडा खळ पडायचा तो पानवलकर जेव्हा दोनतीन महिने अजिबातच फिरकत नसत, तेव्हा. मधल्या काळात त्यांचं एखादं गंभीर आजारपण झालेलं असायचं किंवा कधी ते त्यांच्या घरी सांगलीला, देवासला कुमार गंधर्वांकडे, कुठंतरी मित्रमंडळींच्याकडे गेलेले असायचे. पण हा मधला काळ जसा काही वगळला गेलेलाच नाही अशा सहजतेनं डोक्यावरची पांढरी टोपी आणि खांद्यावरची शबनम बॅग सावरीत ते परत विद्यपीठाकडे येऊ लागले की रेखीव सुंदर अक्षरातलं स्वतःचं काही नवं लिखाणही आपण होऊन वाचायला द्यायचे. त्यावर आपण छान आहे एवढी छोटीशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती त्यांना पुरायची. मी मनात म्हणायची, चला, म्हणजे क्षणोक्षणी बिथरणाऱ्या पानवलकरांचा आपल्याविषयी काही गैरसमज झालेला नाही. मग काही दिवस तेही पुन्हा उत्साहानं माझ्या चाकोरीबद्ध शिक्षकी आणि संसारी जीवनाला थोडंसं डिवचत. ‘‘तुम्हाला का..य माहिती आहे....’’ अशा अधिक्षेपाच्या सुरात आपण वेळोवेळी कथारूप दिलेल्या उग्र, बेबंद जीवनाच्या आणि वाचलेल्या साहित्याच्या हकीकती बोलू लागायचे.
बोलणं ऐकण्यासारखं तर खूप असायचं. सांगायच्या नाट्यमयतेचा झटका त्यांना भुलवीत असायचा. ऐकणाराला अपरिचित असणारं आपण सांगत आहोत ह्यात पानवलकर खूष असायचे. . . . कधी वाटायचं, हे वास्तव टिपताटिपता त्यांच्या नजरेत थोडंअधिक सेन्सेशनल तर झालेलं नाही? पाश्चात्य जगातील हेमिंग्वेच्या प्रतिभेचं अनुकरण तर नाही? पण श्रोत्याची भूमिका सोडून मी त्याबाबत कधी वाद केला नाही किंवा सलगतेनं चर्चाही केली नाही. इथं त्याचा फारसा उपयोग नव्हताच.
साहित्याबद्दलचे, जीवनाबद्दलचे ते सगळे अभिप्राय ऐकताना मी मनातल्या मनात एकीकडे मिस्किलपणं पानवलकरांना सुखावणारा त्यांचा अहंभाव न्याहाळायची; दुसरीकडे एखाद्या वृक्षाच्या कोवळ्या कंदासारखं असावं तसं असणारं या माणसाचं कोमलपण दगडासारखा कठीण आकार कसा धारण करीत गेलं आहे त्याची प्रक्रिया पहात असायची; आणि तिसरीकडे चारचौघांसारखं आयुष्य न काढल्यानं आपल्या सामाजिक व्यवहारात पुरुषालासुद्धा जे अवघडलेपण अनुभवावं लागतं तेही टिपत असायची. . . . पानवलकरांचं बोलणं ऐकणं आणि माझं त्यांना समजून घेणं असं दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर चालायचं. कथालेखक असणाऱ्या पानवलकरांनाही ते समजत असावंच. पण असं स्वतःला टाळत रहाणं त्यांना कदाचित अटळच असावं. अधूनमधून या पद्धतीनं भेटणारे पानवलकर शेवटचे कधी भेटले ते आज मला प्रयत्न करूनही आठवत नाही. . . . त्यांच्या सगळ्या झालेल्या गाठीभेटी बाह्यतः तरी मला एकसारख्याच, आता मी वर्णन करते आहे तशाच काहीशा कॅज्युअल स्वरूपाच्या दिसत आहेत. ह्याला अपवाद फक्त एका प्रसंगाचा आहे. तो मात्र मला स्पष्टपणं आठवतो. एक दिवस त्यांच्या एका मित्रासमक्षच मी त्यांना माझं प्रेक्षकपण पूर्णपणानं टाकून देऊन, त्यांनी स्वतःच्या जगण्याविषयी सावध व्हावं म्हणून थोडं समजुतीनं आणि थोडंसं चिडून भरपूर बोलून घेतलेलं होतं. त्या दिवशी श्रोत्यांची भूमिका पानवलकरांची होती. एखाद्या बनेल लहान मुलासारखं त्यांनी माझं सगळं बोलणं मुकाट्यानं खाली मान घालून ऐकून घेतलं. बोलण्याचा काही उपयोग नाही हे मी मनातून ओळखावं ह्याच पद्धतीनं त्यांच्या सूज आलेल्या, भरणाऱ्या आडमाप पायांकडे बघत ते मुकाट्यानं समोर बसले होते. माझा अनावर आवेग ओसरल्यावर मीही सुन्नपणानं बोलण्याची थांबले. काहीतरी विषयान्तर करून पुन्हा मूळपदावर आले. त्यानंतर काही महिन्यांतच पानवलकर गेलेही.
कस्टम्समधून सेवानिवृत्त होण्यापूर्वी पानवलकरांचं कार्यालय काही काळ माझ्या विद्यापीठाच्या कार्यालयाच्या आसपास, फोर्ट भागात कुठंतरी आलेलं होतं. या काळात कधी वर्गातलं व्याख्यान संपवून मी खोलीत यावं, तर एखादं पुस्तक वाचत समोरच्या खुर्चीवर बसलेले पानवलकर दिसायचे; कधी ते आसपासच्या इतर प्राध्यापकांशी गप्पा मारण्यात रंगलेले असायचे; कधी मधल्या वेळी आले आणि आम्ही आमचे डबे उघडलेले असले की त्यात सहभागी व्हायचे. जन्मभर जेवणाच्या बाबतीत खाणावळीशीच संबंध आलेला असल्यानं एखाद्या साध्यासुध्या पदार्थाच्या चवीचीही अपूर्वाई त्यांना विशेषच वाटायची. मग त्यांनी खूप आवडलं असं म्हणताच मला आणि उषाताई देशमुखांना एकदम उदारतेचा झटका यायचा. आपल्याला भूक नाही असं दाखवून त्यांना तो पदार्थ देण्याची आमची दोघींचीही धडपड चालायची. पण पानवलकर अशा क्षणाला एकदम सावध व्हायचे. अवघडून जायचे. ते पदार्थ खाताखाताच अर्धवट हसत, अर्धवट गंभीरपणानं स्वतःची वेगवेगळ्या प्रसंगांतील बदनामी सांगायला लागायचे. लहानपणी खाण्याची, पोहण्याची, वांडपणाची केलेली बदनामी. . . . पानवलकरांचं हे दुसरं रूप मला ऐकून थोडं माहितीही होतं. पण कुणी काही जाब विचारलेला नसतानाही कशाची तरी कबुली दिल्यासारखे ते म्हणायचे, ‘‘हां.. आम्ही तशी बदनाम मंडळी. . . हां. . लक्षात असू द्या.’’
त्यांच्या या शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही असं ठरवून हे प्रश्न तडीला न नेता विषयान्तर करणं भागच असे. तेच आम्हीही करीत असू.
कधी हे बदनामपण आम्हालाही काही कमी गुंड समजू नका अशा पराक्रमी वृत्तीच्या थाटातसुद्धा पानवलकर व्यक्त करीत. कधी परिस्थितीच्या खोड्यात सापडलेल्या माणसानं अपराधी भावनेनं स्वतःशी पुटपुटावं तसंही खूप काहीतरी मौल्यवान गमावल्याच्या सुरात ते प्रकट होई. पानवलकरांच्या वय आणि व्यवसायपरत्वे निबरट होत गेलेल्या चेहेऱ्यामोहऱ्याशी त्यांचा पहिला पवित्रा जुळायचा; दुसरा काहीसा विसंगत वाटायचा. पण तोही पार खरा होता. आज तोच मला जास्त आठवतो आहे.
हे दुसरे पानवलकर अनपेक्षितपणं एखाद्या प्रसंगात मधेच दिसायचेही. एक दिवस रुपारेल कॉलेजपाशी रहाणाऱ्या प्रा. मा. श्री. विद्वांस यांच्याकडे मी काही कामासाठी निघाले होते. त्यांच्या घराच्या आसपास असणाऱ्या सिनेमा-थिएटरपाशी पानवलकर मला दिसले. मी त्यांना माझ्याबरोबर विद्वांसांच्या घरी चलण्याचा आग्रह केला. आणि थोडेसे संकोचून ते आलेही. प्रा. विद्वांस हे कै. श्री. रमाबाई रानडे यांचे वयोवृद्ध नातू. रमाबाईंचं चरित्र लिहिण्याच्या कामात मोठ्या श्रद्धेनं गुरफटलेले. पानवलकरांची विद्वांसांच्या घरातील सर्व मंडळींशी मी ओळख करून दिली, आणि विद्वांसांनी केलेलं काही लेखन मला वाचून पहायचं होतं, त्याकडे वळले. घरातील मंडळींनी पानवलकरांचं स्वागत त्यांच्या नेहेमीच्या सुसंस्कृत पद्धतीनं, मोठ्या आदबीनं आणि अगत्यानं केलं. पानवलकर जवळजवळ मूकपणानंच ते सर्व वातावरण अनुभवत बसलेले होते. तासाभरानं काम संपवून आम्ही त्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा पानवलकरांचे डोळे डबडबून आले होते. ते माझ्या ध्यानात येऊ नये अशा पद्धतीनं पुसत पानवलकर म्हणाले, ‘‘देवळात जाऊन आल्यासारखं वाटलं हो!’’ हा शेवटचा हो म्हणजे त्यांच्या मानसिक अवघडलेपणातून आलेली त्यांची एक खास लकब!
आवडलेल्या साहित्याचं किंवा चित्रपटाचं सौंदर्य सांगतानाही पानवलकरांची या प्रकारच्या चांगल्या जीवनाची ओढ नेहेमी दिसे. भावुक, भाबडं, निर्मळ, उदात्त, साधं आणि सुंदर त्यांच्या मनाला पुन्हापुन्हा भुरळ घाली. त्यांच्या पाठांतरात असलेली उपदेशपर पंडिती कविताही ते नीति-उपदेशाच्या आणि घोटीव शब्दकळेच्या आवडीतून रंगून म्हणून दाखवीत. कधी तरी मी रस्त्यानं हेलपाटत चाललेले पानवलकर पाहिलेले होते. त्याच्याशी हे दृश्य अगदी विसंगत असे.
पानवलकरांना मी प्रथम पाहिलं होतं ते एका साहित्यिक कार्यक्रमातच. एकोणीसशे बासष्ट साली मी पुण्याहून मुंबईला रहायला आले. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईच्या वाङ्मयीन वातावरणाचा पहिला परिचय मला झाला तो साहित्य-संघाच्या खुल्या नाट्यगृहात झालेल्या एका परिसंवादाच्या वेळी. संघाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दिवशी ग्रामीण कथेवर चर्चा झाली. त्यात वक्ते म्हणून त्या वेळचे नामवंत कथाकार होते. त्यामुळं त्या व्याख्यानाला गर्दीही बरीच होती. पाचव्यासहाव्या रांगेत बसून एक मोठ्या डोळ्यांचा मनुष्य अगदी मन लावून सर्व चर्चा ऐकत असल्याचं व्यासपीठावरून मला दिसत होतं. ब्राँझचा पुतळा असावा तसा त्यांचा सगळा एकात्म आविर्भाव होता. ती तन्मयता सर्व संवेदनशीलता कानांत एकवटून एखादं गाणं ऐकणाऱ्या श्रोत्यासारखीही होती. कार्यक्रम संपल्यावर शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्याशी हस्तांदोलन करून ते गृहस्थ निघून गेले. ते गेल्यावर मिरासदार मला म्हणाले, ‘‘हे श्री. दा. पानवलकर.’’
पुढं पानवलकरांची ओळख झाल्यावर कधी तरी बोलताना या प्रसंगाचा संदर्भ निघाला. पानवलकर म्हणाले, ‘‘मला तुमचं भाषणं त्या दिवशी फार आवडलं होतं. तुम्हाला तसं सांगायचंही होतं. पण भीती वाटली बुवा!’’
त्या दिवशी पानवलकरांच्या त्या भीतीची ती खोटी वाटून मी टिंगलच उडवली. पण आता माझ्या लक्षात येतं आहे की हे त्यांचं बोलणं खोटं नव्हतं. अनेक संदर्भांत अनेक जणांची आणि स्वतःचीही त्याना भीती वाटत असे. खूप दिवसांत विद्यापीठाकडे ते आले नाहीत. आणि त्यांना का आला नाहीत असं आपण विचारलं तर ते अपराधी चेहेऱ्यानं पटकन म्हणायचे, ‘‘भीती वाटली.’’ कुणा मित्राच्या, संपादकाच्या घरी जायची वेळ आली तर तिथं आपलं आगतस्वागत नीट होईल ना या गोष्टीचीही त्यांना भीतीच वाटायची. मी माझ्या विद्यापीठातील ग्रंथालयात त्यांना लिहायला वाचायला बसता यावं म्हणून ग्रंथपालांची परवानगी घेऊन तिकिट काढून दिलेलं होतं. राजाबाई टॉवरमधील ग्रंथालयाचं भव्य आणि उदात्त वातावरण पाहून त्यांनी पहिला उद्गार काढला होता- ‘‘भीती वाटते हो!’’
पानवलकरांच्या दुभंगलेल्या आणि परिस्थितीनं जखमी केल्यावर कोलमडत गेलेल्या आयुष्याचा आविष्कार कदाचित या उद्गारांमधे दडलेला असावा. सांगलीमधील त्यांचं आईवडिलांच्या छत्राखाली गेलेलं ब्राह्मणी विद्यार्थिजीवन, त्यांच्या मनात ज्या स्वप्नांची आणि संस्कारांची पेरणी करून गेलेलं होतं, त्यानं पुढच्या काळातील त्यांच्या जीवनाशी सदैव संघर्षच चालू ठेवलेला होता. तिथं मॅट्रिकपर्यंत संस्कृतचा अभ्यास मोठ्या गोडीनं त्यांनी केला होता, तोही ते कधी विसरले नव्हते. प्रा. वसंत बापट भेटले की विद्यपीठात दोघांच्या संभाषणात नेहेमी त्याला उजळा मिळे. सांगलीच्या शाळेत भेटलेल्या उत्तम शिक्षकांची आठवण तर आमच्या ह्या विद्यार्थिजगतात आल्यावर त्यांना बऱ्याचदा होई. पण वडिलांच्या मृत्यूनंतर लहान वयातच घरातल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या, आणि स्वतःचं शिक्षण थांबवून वेगवेगळ्या नोकऱ्या धुंडाळत त्यांना जावं लागलं. या नोकऱ्यांमधेसुद्धा मुंबईत पहिला काही काळ त्यांनी संस्कृतच्या शिकवण्याच धरलेल्या होत्या! पण मग पानवलकरांचे अनेक व्यवसाय झाले. त्या-त्या धंद्यात जे वातावरण असतं त्याचा एक भाग झाले. तो सांगलीतला मध्यमवर्गीय, हुशार, महत्त्वाकांक्षी, भाषाप्रेमी ब्राह्मण हळूहळू जीवनाची निबरट आणि चरबट रूपंही आपलीच म्हणून स्वीकारून केवळ व्यावहारिक बस्तान बसवीत बसला. त्या प्रकारच्या जगण्याच्या आधारावर शहरात उभं रहाता आलं. बहिणींची लग्नं आटोपली. भावाचा संसार सुरळीत सुरू झाला. पण भाषेच्या प्रेमात आणि लेखनाच्या ऊर्मीत जिवंत राहिलेली सदसद्विवेकबद्धी काही झोपी गेली नाही. मग नंतरच्या काळात पूर्वाश्रमीचे सांगलीतील पानवलकर आणि नंतरचे मुंबईतील पानवलकर एकमेकांशी भांडत, चिडतच जगले. वास्तविक अशाच परिस्थितीच्या अडचणींमधून जाणारी माणसं कितीतरी असतात. स्वतःचाय सदसद्विवेकबुद्धीशी भक्कमपणे तडजोड करून ती मोकळी तरी होतात किंवा मनोबळाच्या जोरावर घसरताघसरता लवकर सावरतातही. पण पानवलकरांचं मात्र स्वतःला सावरू पहाणं आणि त्यापासून ढळणं शेवटपर्यंत थांबलंच नाही. कधी स्वतःला अपात्र म्हणून छेडत रहायचं; कधी आपला अपमान झाला असं मानून अवास्तव हळवेपणानं दुसऱ्याशी वाकडंतिकडे भांडत रहायचं. एखाद्या क्षुद्र घटनेतून गैरसमजांची मालिका निर्माण करायची आणि परिणामतः शेवटी स्वतःच्याच आयुष्यावर तीक्ष्णपणानं चिडून उठायचं. स्वतःला आधार हवा म्हणून मोहवशतेचंही रंगेलपणानं तत्त्वज्ञान बनवायचं. . . . धिटाईच्या आणि धट्टपणाच्या कथा सांगणाऱ्या या संवेदनशील माणसाच्या मनातलं भय ह्या दुभंगलेपणातून तर निर्माण झालेलं नसेल?
एवढं खरं की पानवलकरांच्या कथेमधेसुद्धा भयाची जाणीव कित्येकदा फार हळव्या आणि दुखऱ्या संदर्भात आलेली दिसते.
पानवलकर विद्यापीठात येत असत त्याच काळात त्यांचा एका नृत्याचा जन्म हा कथासंग्रह एम्.ए.चे विद्यार्थी अभ्यासत होते. पानवलकरांना कुणा प्राध्यापकांनी हे सांगितलं, तेव्हा ते मोठ्या उदासपणानं हसले होते.
सांगलीतील जीवनाचा आणखी एक संस्कार पानवलकरांच्या बोलण्यातून नेहेमीप्रमाणंच अवघडलेपणानं प्रकट व्हायचा. लहान मुलं, संसारी स्त्री, नातेवाइकांसह असणारं एखादं मोठं कुटुंब, घरंदाजपणा, चांगल्या रीतिभाती आणि अस्सल धार्मिक जीवन यांबद्दलची ओढ एखाद्या स्वप्नासारखीच नजाकतीनं त्यांनी जोपासलेली जाणवायची. चारपाच वर्षांपूर्वी मौजेच्या दिवाळी-अंकात सहधर्मचारिणी या लेखात कै. श्री. रमाबाई रानड्यांचं न्यायमूर्तींच्या मृत्यूनंतरचं गृहजीवन सविस्तरपणं आलेलं होतं. त्या लेखावरील प्रतिक्रिया सांगताना पानवलकर मला म्हणाले, ‘‘अहो, तो लेख वाचण्यात अगदी रंगून गेलो होतो; पण मधेच एकदम दचकलो. मला वाटलं, हा लेख लगेच संपणार तर नाही ना? भराभर पुढची पानं उलटून पाहिली तर लेख आणखी बराच होता. मग जीव खाली पडला. लेख पुन्हा शांतपणानं प्रथमपासून वाचला.’’
पानवलकर (दोन)
स्वतःच्या जवळच्या कुटुंबियांबद्दलसुद्धा पानवलकरांच्या मनात नुसतीच कर्तव्यबुद्धी नव्हती. त्यांचं सुख पहाण्यात कर्तेपणाचा आनंदही होता. ते कधी आपल्या घराबद्दल फार सविस्तर बोलल्याचं मला आठवत नाही. पण एकदा ते मुद्दाम विद्यापीठात आले होते आणि काहीशा संकोचानं मला म्हणाले होते, ‘‘बाई, माझं एक काम तुम्ही कराल का?’’
मी विचारलं, ‘‘काय?’’
पानवलकर उत्तरले, ‘‘कालच मी पुण्याहून भाचीचं लग्न ठरवून आलो. याद्या वगैरे झाल्या. आठ दिवसांनी लग्न आहे. भाचीला मी महटलंय, तुला छान हिरव्या रंगाची भारदस्त इंदुरी साडी देतो. आमच्या घरातली फार गुणी मुलगी आहे ही. पण इथं दुकानात गेलो, अन् कोणती इंदुरी हेच कळेना. मला जरा मदत करता का?’’
दुकानात पानवलकरांनी साडी तर घेतलीच; पण तिथून बाहेर पडताच त्याबरोबर देण्यासाठी खण, नारळ हेसुद्धा घेऊन ठेवलं.
माझ्या लक्षात आहेत ते हे श्री. दा. पानवलकर. संसाराचं कसलं लचांड आपल्यामागं नाही म्हणून स्वतःच्या सडेफटिंगपणाबद्दल व खरं खुषीत गरजणारे आणि दुसरीकडे संसारी माणसापेक्षाही अधिक विवशतेनं आत्मीयतेच्या पिंजऱ्यात सतत अडकलेले. . . . त्यातच स्वतःभोवती गरगरत राहिलेले. . . . स्वतःमधील दरी बुजवण्याच्या प्रयत्नात मृत्यूच्या दिशेनं फेकले गेलेले.

No comments:

Post a Comment