Tuesday, July 5, 2011

सांगलीचे दिवस

- म. द. हातकणंगलेकर

पानवलकर
सांगली बहु चांगली ही उक्ती अजूनही लोकांच्या ताजेपणाने स्मरणात होती आणि ती त्यांना सार्थही वाटत होती, असा तो काळ होता. १९३५ ते ४५चे दशक आठवले तर ते पानवलकर आणि त्यांचे शाळामित्र यांच्या पौगंडावस्थेचे दशक होते. या काळापर्यंत बहुतेक महत्त्वाची सांगली म्हणजे जुनी सांगलीच होती. या शहराची सुरुवात नदीकाठच्या सहा गल्ल्यांनी झाली. ती जुनी सांगली म्हणून अजूनही ओळखली जाते. पानवलकरांच्या बाळपणाची हीच सांगली. येथेच नदीचे पात्र, निरनिराळे घाट, विष्णुमंदिराजवळचा घाट, मढेघाट, आयर्विन ब्रिज, पलीकडच्या काठावरच्या सांगलवाडीच्या मळ्या, मंदिरे, व्यायामशाळा ही ठिकाणे याच भागात शाळा आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची गल्ली. ही भूमी आणि ही ठिकाणे पानवलकरांच्या कथांना चिकटलेली आहेत. या भागाला लागूनच पांजरपोळ, सराफकट्टा आणि गणपती-मंदिर. तिथून खाली आंबराईपर्यंत पसरलेले गाव. नंतरची वाढ, पूर्वेकडे मिरज, कुपवाड, बुधगाव, माधवनगर या बाजूला. वुडहौस, शिवाजीनगर एक्स्टेन्शने, सांगली जिमखाना आणि मिरजवाटेला सुखवस्तू, उच्च मध्यमवर्गीयांचे बंगले. कोपऱ्यावर शिरगावकरांचे राममंदिर आणि मंदिराच्या सेवेत असलेली भटजींची कुटुंबे. आमराई गर्द, गार आणि गूढ. संस्थानी काळात आठवड्यातून एकदा तेथे बँडवादन होत असे. ते ऐकण्यासाठी काही पालक आपल्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी इतमामाने जात असत. आमराईत बंदिस्त टेनिसकोर्टे होती. तेथे राजघराण्यातील माणसे, राजकन्यादेखील आणि खाशी मंडळी टेनिस खेळत. त्यामुळे त्या बाजूला सरसकट भटकता येत नसे. माणसांची गर्दी आणि भेळविक्यांच्या गाड्या अजूनही तयार झाल्या नव्हत्या. आमराईत फार दिवे नसत; आणि संध्याकाळच्या सावल्या लौकरच लांब आणि दाट होत. शेजारी सांगली हायस्कूलची संस्थानी काळातील ब्रिटिश स्थापत्यकलेच्या नमुन्याबरहुकूम बांधलेली मोठी पांढरी इमारत होती. तिथली काही चुकार मुले दुपारच्या वेळी आमराईतल्या गारव्याला जाऊन बसत. पानवलकरांच्या आवडीचे हे ठिकाण होते. मुंबईहून जेव्हाजेव्हा ते छोट्या मुक्कामासाठी सांगलीस येत, तेव्हा या आमराईत त्यांचा चौकस फेरफटका असे. तिथल्या वातावरणात झालेले बारीक फेरफार ते दक्षतेने टिपून घेत आणि तिथल्या सिमेंटच्या जाळीदार बाकावर बसून भूतकाळात प्रवेश करीत. आमराईच्या पाठीमागच्या गेटमधून एक वाट बाहेर पडून शेताच्या बांधावरून बुधगाव रस्त्याला मिळत असे. या रस्त्याच्या चढावर पोचले की राजेसाहेबांच्या माळबंगल्याचे आवार सुरू होत असे. हा परिसर सामान्य सांगलीकरांना अवगत होत नसे. टेहेळणी-बुरुज, चौकी-पहारे असा सारा बंदोबस्त या माळबंगल्याभोवती असे. त्यामुळे हा परिसर आदर आणि भीती यांनी भारलेला असे. राजेसाहेबांच्या सेवेत जी माणसे होती त्यांनाच या परिसरात वावरण्याची मुभा होती. या कुटुंबातील मंडळींचा गावातल्या सामान्य माणसांना हेवा वाटत असे. आज ना उद्या राजेसाहेबांच्या कृपेने या कुटुंबाचे भाग्य नक्की उजळणार याची त्यांना खात्री होती. पुढे काही कुटुंबांच्या बाबतीत तसे घडलेही.
माळ-बंगल्याच्या खालच्या बाजूल टेहेळणी-बुरुजालगत खेळाचे मैदान होते. तेथे हॉकी आणि फुटबॉल या खेळांचा सराव चालत असे. सांगली संस्थानच्या या खेळातल्या टीम्स होत्या. या खेळाच्या मोठ्या मॅचेस् लोकांच्या सोयीसाठी गावातल्या राजवाडा-चौकात होत असत. बक् अप रावण- मधला रावण हा त्या काळात सांगली संस्थानच्या टीमचा पेले होता. या भीमकाय माणसाचे पराक्रम हे नागरिकांच्या कौतुकाचे विषय होते. या माणसाला नंतर एस्.टी.च्या खडखडाटात आपले आयुष्य संपवावे लागले. खेळ, क्रीडा, व्यायम या क्षेत्रात आणखी एक बलदंड माणूस त्या काळात सांगलीत वास्तव्य करून होता. सर्वसाधारण उंचीचा पण अंगाने गच्च भरलेला, बुटक्या नाकाचा, कुरळ्या केसांचा, दाट भुवयांचा, साधा पण रुबाबदार असा हर तऱ्हेचा पेहराव करणारा हा माणूस अनेकांना अजोड वाटत असे. बालवीरांच्या चळवळीचे काम हा मोठ्या उत्साहाने आणि नेटकेपणाने करीत असे. वर्षातून एक दिवस सर्व शाळांतील मुले गणवेषात शहराच्या हमरस्त्यावरून संचलन करीत राजवाडा-चौकात जमत आणि पटांगणात त्यांची कवायत घेतली जात असे. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व मुलांना खाऊ वाटला जात असे. खाऊचे रंगीत कागद रस्ताभर पसरीत ही मुले दुपारच्या वेळी आपापल्या घरी परतत. या कार्यक्रमाचे नेतृत्व आणि सारी व्यवस्था या बलदंड माणसाकडे असे. आम्ही शिकत असताना अनेक वर्षे आम्ही बालदिनाचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पहात असू. एकदोन वेळा त्यात सामील झाल्याने घरी येण्यास फार वेळ झाल्याचे स्मरते. या व्यायामप्रेमी, हरहुन्नरी आणि कल्पक गृहस्थाचे नाव होत- देवधरमास्तर. कोणत्याही खेळाच्या मैदानावर ते ठळकपणे वावरताना दिसत. अनेक खेळांचे पंच म्हणून ते नंतर काम करीत. व्यायाम-शिक्षकाचे काम करीत असतानाच त्यांनी सांगलीतले पहिले सोडा-लेमनचे दुकान काढले. युनियन सोडा-वॉटर असे त्याचे नाव होते. दुकानाच्या पाटीवर दंडाचे जबरदस्त स्नायू दाखवणाऱ्या पिळदार शरीराच्या माणसाचे चित्र होते. शाळकरी मुलांना या दुकानाचे मोठे आकर्षण वाटत असे. अर्थात मुलांनी असल्या दुकानांत जाऊन पेय घ्यावे अशी रीत नव्हती.
माझ्या लहान मामांचे देवधरमास्तर स्नेही होते. मामांनी मला एकदा त्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या दुकानात नेले होते. माझी मराठी शाळा या भागातच होती आणि ती आम्ही रहात होतो त्या भागापासून बरीच लांब होती. म्हणून काही मदत लागली तर देवधरमास्तरांकडे जाण्यास हरकत नाही, हे सांगण्यासाठी मामांनी मला त्यांच्याकडे नेले होते. त्यांच्या दुकानात जाण्याची गरज पडली नाही आणि धीरही झाला नाही. देवधरमास्तरांनी आपल्या दुकानात खालच्या वर्गाची मुले कामाला घेतली. पुरोगामी विचारांचे अंग त्यांना होते. धाडस आणि बेदरकार वृत्ती तर होतीच होती. यांपैकी काही हुषार, कर्तबगार मुलांनी सोडा-वॉटर आयस्क्रीमची स्वतंत्र दुकाने काढली आणि त्यात यश मिळवले. आज या लोकांची घरेदारे सांगलीत झाली आहेत. मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या व्यवसायात स्थिर झाली आहेत. देवधरमास्तरांना मात्र पुढे गाव सोडून जावे लागले. नंतर ते हॉटेलच्या व्यवसायात शिरले. बेदरकार वागण्याने आयुष्यात धक्के बसले. आपल्या हॉटेलातून उघडउघड ऑम्लेट व अन्य सामीष पदार्थ देण्याचे त्यांनी चालू केले. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी खळबळ मात्र उडवून दिली. त्यांचे व्यक्तिगत वर्तनही सर्वार्थाने स्वतंत्र होते. ते केवळ स्वच्छंदी नसून, त्यात काही पुरोगामी विचारांवरची निष्ठा प्रकट करण्याचाही भाग होता. त्यांनी दुसरा विवाह जातीबाहेर केला आणि तो प्रतिष्ठेने सांभाळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पानवलकरांच्या बऱ्याच कथानायकांची बीजे सापडतात.
आमराईच्या समोरचा रस्ता महत्त्वाचा होता. या रस्त्याच्या तोंडाशी उजवीकडे आडवा जाणारा रस्ता दुसऱ्या अर्थाने महत्त्वाचा होता. तो वखार-भागातून गणपतिपेठेत जात असे. त्याच्या दुसऱ्या टोकाला गणपतीचे भव्य मंदिर. आमराईच्या समोरच्या रस्त्यावर एका बाजूला सांगलीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि गर्भश्रीमंत, सुशिक्षित नागरिकांचे चारपाच प्रशस्त बंगले या रस्त्यावर होते. या दुमजली, घडीव दगडी बंगल्यांचा दरारा वाटत असे. टिळकांचे सहकारी म्हणून गाजलेले कायदेपंडित श्री. केशवराव छापखाने, अभ्यंकर, माईणकर, कोल्हटकर अशा मंडळींचे हे बंगले होते. त्याच्या पुढच्या बाजूला जिल्हाधिकारी, जिल्हा-न्यायाधीश यांची निवासस्थाने आज आहेत. त्याला लागूनच सांगली, कोल्हापूर अशी छोटी रेल्वेलाइन. संस्थानी काळात, सध्या जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे त्या ठिकाणी मुख्य कारभारी अगर रेसिडंट यांचा बंगला होता. डे नावाचे बंगाली अधिकारी त्या ठिकाणी रहात असल्याचे आठवते. खाकी ब्रीचेस घालून सकाळी घोड्यावरून रपेट करून घामाने निथळत येताना तो न चुकता दिसत असे. आमची शनिवारची शाळा असल्याने त्या दिवशी तर तो आम्हाला हमखास भेटत असे. त्यांनी संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्याचे लोक सांगत. कारभारात तो कडक असल्याचेही बोलत. लोकांना त्याची भीती आणि आदर वाटत असे. कोल्हापूर संस्थानात जशी प्रजापरिषदेची चळवळ सुरू झाली, तशी सांगली संस्थानात करण्याची गरज भासली नाही; कारण या संस्थानचा कारभार लोकाभिमुख आणि त्यांच्या हिताची दखल घेणारा असा राहिला. दक्षिण-महाराष्ट्रात जे पुरोगामी विचारांचे, कलाविद्याप्रेमी, उच्च विद्यासंपन्न आणि सुसंस्कृत संस्थानिक होते, त्यांत सांगलीच्या राजेसाहेबांची आणि राणीसाहेबांची गणना होत असे. सर चिंतामणराव पटवर्धन आणि सौ. सरस्वतीदेवी पटवर्धन अशी त्यांची नावे होती; आणि ती अतिशय आदराने घेतली जात असत. राजेसाहेबांच्या निमंत्रणावरून भारतीय किर्तीचे विद्वान सांगलीला भेट देत असत. सर राधाकृष्णन् हे दोनतीन वेळा सांगलीस आल्याचे आठवते. त्यांची अखेरची भेट, राजेसाहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सांगलीकर जनतेने मोठ्या उत्साहाने आणि वैभवाने साजरा केला, तेव्हा झाली. तो सर्व सोहळा अत्यंत हृद्य झाला. राधाकृष्णन् यांनी आपल्या नेहेमीच्या शैलीत उत्कट भाषण केले. सर सी. व्ही. रामन, चिंतामणराव देशमुख, बॅ. जयकर, बॅ. छगला, सर पी. सी. रामस्वामी यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञचा आणि विद्वानांचा सहवास राजेसाहेबांच्यामुळेच सांगलीकरांना मिळत होता. इंग्रजी शिक्षणाने आणि इंग्रजी विचारांनी जे उदारमतवादी आणि प्रगतिसन्मुख असे वातावरण देशातील सुशिक्षित वर्गात पसरले होते त्याचे अत्युत्तम संस्कार राजघराण्यावर ठसले होते. पुरोगामी विचारांबरोबरच आध्यात्मिक विचारांचाही पगडा राजेसाहेबांच्या मनावर खोलवर झालेला होता. या क्षेत्रातील थोर मंडळीही वारंवार त्यांच्याकडे असत. त्यांच्या सत्संगाचा लाभही सांगलीकर जनतेला होत असे. गुरुदेव रानडे, कोटणीसमहाराज यांच्यापासून बियासचे शीखपंथीय गुरू यांच्यापर्यंतचा त्यांचा या क्षेत्रातील अधिकारी पुरुषांशी संपर्क होता. माळबंगल्यावर ध्यानधारणेसाठी एक सुंदर निवान्त वास्तू त्यांनी बांधवून घेतली होती. गणपती हे तर त्यांचे कुलदैवतच होते.
संस्थानचे सर्व सार्वजनिक सण-समारंभ मोठ्या इतमामाने साजरे होत. दरबार हॉलमधून राज्यकारभाराबद्दलचे निर्णय घेतले जात. तेथे शाळकरी मुलांचा शिरकाव नसे. दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या वैभवशाली मिरवणुकीत भाग घेण्यासाठी आम जनता हमरस्त्यांच्या दुतर्फा उभी राहिलेली असे. सजवलेल्या छबिन्याचे बायापोरे डोळे भरून दर्शन घेत. घोडे, उंट, हत्ती, सुंदर गजराज यांची मोठीच शोभा दिसत असे. हाच संस्थानी थाट. आम जनतेला स्वाऱ्यांचे दर्शन याच दिवशी होत असे. गावाबाहेरच्या आपट्याच्या मैदानात सोने लुटण्याचा कार्यक्रम यथासांग तासभर चाले. बँड, वाजंत्री, शिंग यांच्या आवाजांनी वातावरण भरून जाई. संध्याकाळ कलली की मिरवणूक परतत असे. या वैभवाचे अप्रूप सर्व थरांतील लोकांना वाट असे. संस्थानी इभ्रतीचे मानबिंदू सर्वांच्या अभिमानाचा विषय असत. किंबहुना ते त्या काळच्या ब्राह्मणी जीवनाचे श्रेयस होते. संस्थानी सेवेत असलेली अनेक कुटुंबे त्यामुळे निश्चिंत, निर्भर असत. पानवलकरांचे वडील या काळात संस्थानच्या सेवेत एका हुद्द्याच्या जागेवर होते. कदाचित त्यांच्या संबंधाने कानी आलेल्या हकीकतीवरून श्रीमंतांचा वस्तरासारख्या कथा त्यांना सुचलेल्या असाव्यात. या विषयावर एक कादंबरी लिहिण्याचा त्यांचा मानस होता. राजघराण्यातील अंदर्गत घडामोडींची माहिती त्यांना होतीच; पण दोन पिढ्यांच्या या घराण्यातील माणसांच्या आयुष्याची रूपरेषाही त्यांना ठाऊक होती. त्यांतल्या मोक्याच्या अंधाऱ्या जागांबद्दल त्यांनी चिंतन केले होते व त्यातून काही घाट कसा तयार होईल याचा प्राथमिक शोध त्यांन घेतला होता. ही कादंबरी त्यांच्या हातून जर लिहून झाली असती तर कै. साधुदासांनी पेशवाईच्या अखेरिस ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांतले खोलवरचे सामर्थ्य प्रकट करणारी ही कादंबरी झाली असती. संस्थानी जीवनावर मराठीत आणि भारतीयांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या कादंबऱ्यांतून या जीवनाच्या बहुविध अंगांचे आणि व्यक्तींचे जे दर्शन आपल्याला घडते ते वरवरच्या नाट्यमयतेने भरलेले असते. त्या खालच्या अंतःप्रवाहाची संगती लावण्याचा प्रयत्न क्वचितच होतो. त्यासाठी चिंतनशील, नाट्यगर्भ कलात्म दृष्टी असावी लागते. पानवलकरांच्याजवळ ती होती. त्यांच्या या कादंबरीत त्यांच्या सर्व लेखनगुणांचे एकत्रित आणि कथांच्यापेक्षा अधिक ताकदवान असे दर्शन घडले असते.
त्या काळातील सांगलीतले वातावरण हे संघटनेच्या, सामर्थ्याच्या आणि पौरुषाच्या विचारांनी भरलेले होते. समर्थ व्यायामशाळेसारख्या संस्था, पुराच्या पाण्यातील पोहण्याच्या शर्यती, फुटबॉलच्या मॅचेस, क्रांतिकारक विचारांच्या तरुणांची गुप्त मंडळे आणि त्यांच्या मसलती, त्यांनी जमा केलेली शस्त्रास्त्रे, सणा-उत्सवाच्या प्रसंगी निर्माण होणारे जातीय तणाव, दंगेधोपे, राष्ट्रीय विचारांच्या पुढाऱ्यांची रक्त गरम करणारी वक्तव्ये, त्यांना प्रतिसाद म्हणून व्यक्तिगत सुखाला पाठ फिरवण्यास तयार झालेली माणसे यांनी सांगली-मिरजेचे वातावरण सळसळत राहिले होते. त्यात ब्राह्मणी संस्थानच्या आश्रयाने जिवंतपणे काम करणाऱ्या परंपरा आणि संस्था होत्या. वैदिक संस्कृत विद्येच्या पाठशाळा, आश्रम, अन्नछत्रे, मंदिरातले विधी-समारंभ हे तर प्रतिष्ठेने चालू होतेच; पण त्याबरोबर नवीन काळातही पुरातन संस्कृत भाषेचे ज्ञान निष्ठापूर्वक नव्या पिढीला देणारी व्यासंगी, विद्वान शिक्षकमंडळीही शिक्षणसंस्थांत काम करीत होती. दिक्षितमास्तर हे त्या काळातले नामवंत संस्कृतचे शिक्षक होते. त्यांनी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची परंपरा सांगलीत निर्माण केली होती. ते सिटी हायस्कूलमध्ये काम करीत. तीच पानवलकरांची शाळा होती. पानवलकरांच्या कथांतील संस्कृतनिष्ठ वातावरण, त्यांतील संस्कृत अवतरणे आणि संस्कृत वाङ्मयातील संदर्भ यांचे मूळ त्यांच्यासारख्या संस्कृत भाषा आणि विद्या यांच्या संस्कारात आहे. या खाली पाटीलशास्त्री नावेचे दुसरे संस्कृत-शिक्षक दुसऱ्या शाळेत काम करीत असत; आणि साधुदासांसारख्या रसिक आणि कुशाग्र बुद्धीच्या राजकवीचे वास्तव्यही याच वेळी सांगलीत होते. ते संस्थानचे राजकवी झाले आणि यशवंतांच्या काव्यगुणांचा परिपोषही त्यांनी केला. या सर्व वातावरणात, परंपरेचा अभिमान असणाऱ्या, देशप्रेमी, शक्तिपूजक रसिक पौरुषत्वाचा एक कल्पनादर्श तयार झालेला होता. त्या आदर्शाचे आकर्षण असणारे सारेच त्यात सामावले गेले नाहीत. त्या आदर्शाची अनघड सामग्री जवळ असतानादेखील आयुष्याला अनपेक्षित वाटा-वळणे मिळाल्याने ज्यांना वरकरणी या आदर्शापासून बाजूला जावे लागले आणि याची खंत ज्यांनी मनात बाळगली, असे तरुणही त्यांत अर्थातच होते. या प्रकारच्या तिरकस वेढ्यात पानवलकर सापडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच्याशी संलग्न असलेला कलाव्यवहारही राष्ट्रप्रेमी कलावंतांकडून आणि निर्मात्यांकडून घडत होता. शेजारचे कोल्हापूर हे कलापूर होते. संस्थान मराठा होते आणि तेथेही राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत होती. बाबूराव पेंटर हे कलामहर्षी तेथेच रहात होते. पण अधिक आकर्षण वाटावे असे, प्रभावी वक्तृत्व असलेले, तेजस्वी संवाद लिहिणारे श्री. भालजी पेंढारकर हे एकामागून एक तडफदार चित्रपट सादर करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वैभवशाली आणि पुरुषार्थ प्रज्वलित करणारी अवघी राजवट ते रुपेरी पडद्यावर साकार करीत होते. शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी तरुणांच्या मनावर पक्की ठसवली होती. पानवलकरांना तिचे आकर्ष न वाटले तरच नवल होते. शिवाजीच्या भूमिकेला त्यांचे धारदार नाक आणि चेहेरा अनुरूप होता. त्या वेळच्या गणपती-उत्सवाच्या मेळ्यात त्यांच्या मित्रांनी हे सोंग घेतले होते. तर एका नाटकात पानवलकरांनीही तसा यत्न केला होता. त्याची हकीकत त्यांनी एका कथेत सांगितली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळाची सुरुवात ही त्यांच्या हायस्कूलचे शिक्षण समाप्त होण्याची वेळ होती. त्यानंतर देशाची फाळणी झाली आणि जातीय तणाव कमालीचे वाढले. हिंदू परंपरेचा अभिमान बाळगणारे देशप्रेमी तरुण या घटनेने कायमचे व्यथित झाले. त्यातच महात्मा गांधींचा वध झाला आणि ब्राह्मणविरोधाची लाट भलतीच विषारी झाली. पश्चिम-महाराष्ट्रात ब्राह्मण जामातीविरुद्ध आगडोंब उसळला. त्यांची घरदारे, मालमत्ता बेचिराख झाली. पानवलकरांचे घर त्यातून मोठ्या शिताफीने बचावले. पण या लोकक्षोभाला बळी पडलेल्या ब्राह्मण कुटुंबांना वर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. या वावटळीचा परिणाम या घरांतील तरुणांवर झाला आणि त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत. पानवलकर या काळात भाजले-पोळलेले होते. त्यांचे पूर्वीचे बलोपासक सहकारी यानंतर जगण्यासाठी अनेक दिशांना पांगले. पानवलकरांनाही घरदार सोडावे लागले. त्यानंतर अखेरपर्यंत ते अनिकेत अवस्थेत राहिले.
या काळातच सांगली संस्थानात तंबाखूसाठी अबकारी खाते उघडण्यात आले. या खात्यात सुरुवातीला ब्राह्मण सुशिक्षित अधिकारी नेमण्यात आले. रविकिरण मंडळाचे एक सदस्य श्री. द. ल. गोखले हे या खात्यात अधिकारी होते. नोकरीची ही वेगळी संधी त्या भागातील लोकांना पहिल्यानेच उपलब्ध होत होती. पगार इतर नोकऱ्यांपेक्षा बरा मिळत असे. अधिकार होता आणि अधिकारामुळे निर्माण होणारी संधीपण होती. अर्थात हा प्रवृत्तीचा पार मोठा फैलाव त्या काळात झाला नव्हता. अगदी कोवळ्या वयात, दीक्षितमास्तरांच्या रघुवंशातून पानवलकरांनी या क्षेत्रात पदार्पण केले. ते त्यांना कौटुंबिक कारणासाठी करावे लागले.
आम्ही हायस्कूलमध्ये शिकत असतानाची आम्हाला आठवणाऱ्या सांगलीची ही स्थूल रूपरेषा आहे. यात अनेक तपशील साहजिकच भरता येतील. पण ते तपशीलच असतील. त्या काळातील प्रवृत्तीत आणि वातावरणात त्या तपशिलांनी महत्त्वाची भर पडेल असे नाही.

2 comments: